पान 2 : म्हापसा पालिकेच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण
By admin | Published: July 31, 2015 12:22 AM
पुढील आठवड्यात अहवाल प्रशासनाला सादर
पुढील आठवड्यात अहवाल प्रशासनाला सादर म्हापसा : राज्यातील इतर पालिकांबरोबर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार्या म्हापसा पालिकेच्या निवडणुकीसाठीच्या प्रभाग फेररचनेचे काम पूर्ण झाले असून पुढील आठवड्यात पालिका प्रशासनाला अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती मामलेदार मधू नार्वेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. पालिकेतील प्रत्येक प्रभागात समान मतदार ठेवताना प्रभागात जास्त बदल करण्यात आलेला नसल्याचे ते म्हणाले. मागील सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेले प्रभाग फेररचनेचे काम वेळेवर पूर्ण होऊ न शकल्याने त्यास नंतर दोन आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली. बार्देसचे मामलेदार मधू नार्वेकर यांनी गुरुवारी हे काम पूर्ण केले. पुढील आठवड्यात पालिका प्रशासनाला आपला अहवाल ते सादर करणार आहेत. पालिकेचे प्रभाग 15 वरून 20 करण्याचा निर्णय सरकारने अगोदरच घेतला. मात्र, प्रभाग 20 वरून 21 करण्याचे घाटत असले तरी याबाबत मामलेदारांना कोणतीही सूचना नसल्याने वीसच प्रभाग करण्यात आलेअसल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.नवी प्रभाग रचना भूगौलिक रचनेवर नसून समान दीड हजाराच्या आसपास मतदार ठेवून करण्यात आली आहे. काही प्रभागात 1200, तर काही प्रभागात 1600 पर्यंत मतदारांचा समावेश आहे. कुचेली येथील प्रभाग 1 ची विभागणी करण्यात आली असून या प्रभागाचे दोन प्रभाग करण्यात आले आहेत. या प्रभागात सुमारे 3 हजार मतदारांचा समावेश होता. धुळेर हा प्रभाग दोन तसेच करासवाडा हा प्रभाग तीन अशी विभागणी करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष संदीप फळारींच्या प्रभाग 10 ची विभागणी करण्यात आली. यात समावेश असलेल्या दत्तवाडी, गणेशपुरी व हाउसिंगबोर्डाची विभागणी करून त्याचे दोन प्रभाग बनवण्यात आले आहे. तसेच खोर्ली सीम, अन्साभाट-गणेश मंदिर, अन्साभाट व पेद्रूभाट येथील प्रभागांत फेरबदल करून ते वाढवण्यात आले आहेत. पालिकेतील आकय, व्हडले पेडे व कामरखाजन हा प्रभाग 4 आणि शेटयेवाडा, पेडे व धुळेरचा काही भाग हा प्रभाग 5 या हळदोणा मतदारसंघातील दोन प्रभागांत व इतर प्रभागांत काही किरकोळ फेरबदल करण्यात आले. ही प्रभाग रचना 31 जानेवारी 2014 साली प्रकाशित करण्यात आलेल्या मतदार यादीच्या आधारावर तसेच त्यानंतर प्रकाशित करण्यात आलेल्या जोडमतदार यादीच्या आधारावर करण्यात आली. केलेली ही प्रभाग रचना पालिका प्रशासन लोकांच्या हरकतीसाठी वा सूचना मांडण्यासाठी खुल्या ठेवणार असून त्यानंतर त्या अधिसूचित करण्यात येणार आहेत. चौकट- 20 की 21 घोळ कायमपालिकेतल्या प्रभागांची संख्या 15 वरून वाढवून ती 20 करण्यात असली तरी 20 वरून हे प्रभाग 21 करण्याचा उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचा मानस होता. मात्र, 20 प्रभाग ठेवूनच फेररचना करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याविषयी डिसोझा यांना विचारले असता पालिका कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक विधानसभेत मांडण्यात येणार असल्याची माहिती दिली. पालिका प्रशासक एल्वीस गोम्स व मामलेदार मधू नार्वेकर यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी यासंबंधी आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगून पूर्वी निश्चित करण्यात आल्याप्रमाणे 20 प्रभागांचीच फेररचना करण्यात आल्याची ते म्हणाले. मात्र, या पार्श्वभूमीवर पालिका कायद्यात दुरुस्ती विधेयकात प्रभाग 21 दर्शवल्यास प्रभागांची नव्याने फेररचना होण्याची शक्यता आहे.