पान 2 : खाण माल वाहतूक
By admin | Published: July 31, 2015 12:20 AM
बंदी असूनही खाण मालाची वाहतूक
बंदी असूनही खाण मालाची वाहतूकदोघांना अटक : ट्रकसह दोन लाखांचा माल हस्तगतसावर्डे : खनिजाचे उत्खनन व वाहतूकही करण्यास बंदी असूनही रिवण येथील खाणीवरून काकोडा औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यात आणलेला मॅँगनिज खनिज माल गुरुवारी संध्याकाळी कुडचडे पोलिसांनी मुद्देमालासह पकडला. ट्रकचालकासह कारखान्याचा मालक या दोघांना अटक केली असून टिप्पर ट्रक व मॅँगनिजचा सुमारे 2 लाखांचा माल जप्त केला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून काकोडा येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीत असलेल्या ए. आर. माइन्स इंडस्ट्रीज या कारखान्यात बेकायदेशीररीत्या खनिज माल आणण्यात येत होता. कुडचडे पोलिसांनाही याची कुणकुण लागली होती. त्यानुसार पोलिसांनी फॅक्टरीच्या मालकाकडे विचारपूसही केली होती. मात्र, त्याने त्या वेळी कर्नाटक व इतर ठिकाणाहून आणलेल्या मालाची बिले दाखवून पोलिसांना गुंगारा दिला होता. गुरुवारी संध्याकाळी कुडचडे पोलिसांना एक टिप्पर ट्रक मॅँगनिज माल आणल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर पोलीस कुमक घेऊन येथे गेले असता जीए 05 टी 0651 हा टिप्पर ट्रक मॅँगनिज माल खाली करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी लगेच छापा टाकून ट्रकचालक विनोद सगुण नाईक (अस्तेमळ, कामराल) याला व खनिज मालासह ट्रकही ताब्यात घेतला. ट्रकचालकाने हा मॅँगनिज माल धडे-सावर्डे येथील गौतम आनंद भंडारी यांचा असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गौतम भंडारी, ट्रकचालक विनोद नाईक व ए.आर. माइन्स इंडस्ट्रीजचे मालक अरमान जितेंद्र बेंकले या घोगळ-मडगाव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. भारतीय दंड संहितेच्या 379, 411, कलमासह 43 व्या कलमानुसार गुन्हा नोंद केला असून माइन्स व मिनरल कायद्याच्या कलम 4-1 (अ) 21(6) ही कलमेही लावली आहेत. सध्या गौतम भंडारी फरार असून त्याचा शोध घेत आहेत. ट्रकचालक विनोद नाईक व फॅक्टरीचे मालक अरमान बेंकले यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे गौतम भंडारी याच्या जवळच्या एका नातेवाईकाची रिवण येथे खाण आहे. त्या ठिकाणी सेक्युरिटी गार्डही तैनात असून त्याच्याच संगनमताने भंडारी गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीरपणे मॅँगनिज मालाची वाहतूक करीत होता. कुडचडे पोलीस खाण खात्याला पाचारण करून या मालाची ग्रेड काढणार आहेत. त्याचप्रमाणे हा माल ज्या ठिकाणाहून आणलेला आहे त्या ठिकाणाची पाहणी करून खाण खात्याला येथून किती मालाची उचल केलेली आहे याची चौकशी करण्यास सांगणार आहेत. त्याचप्रमाणे माल काढला त्या जागेच्या मालकावरही गुन्हा नोंद करण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे प्रकरण मिटविण्यासाठी मोठय़ा रकमेची ऑफर पोलिसांना दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, कुडचडेचे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी कोणतीही कुचराई न करता गुन्हा नोंद केला असून अर्जुन सांगोडकर पुढील तपास करीत आहेत. (लो.प्र.)