पान ४ कुर्टी-खांडेपार सरपंचावर अविश्वास ठराव
By admin | Published: April 25, 2015 2:10 AM
४ मे रोजी चर्चा : सुप्रिया गावडे सरपंचपदाच्या दावेदार
४ मे रोजी चर्चा : सुप्रिया गावडे सरपंचपदाच्या दावेदारफोंडा : चार महिन्यांपूर्वीच सत्ताबदल झालेल्या कुर्टी-खांडेपार पंचायतीत पुन्हा एकदा सत्ताबदलाचे संकेत असून सरपंच प्रिया च्यारी यांच्यावर पंचायत मंडळातील सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्याचे पंचायतीतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी ४ मे रोजी सकाळी ११ वा. पंचायत सभागृहात चर्चा होणार आहे. माजी सरपंच दीपा नाईक यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी विराजमान झालेल्या प्रिया च्यारी यांना अवघ्या काही महिन्यांतच अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. प्रिया च्यारी यांना सरपंचपदी बसविण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले पंचसदस्य नरेंद्र परब यांनी पुन्हा मगोशी संधान जुळवल्याने प्रिया यांचे पद धोक्यात आले आहे. दरम्यान, मगोत घरवापसी केलेले नरेंद्र परब सध्या अज्ञातवासात असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, त्यांच्या घरवापसीबाबत मगो समर्थक अन्य पंचायत सदस्यांकडून दुजोरा मिळाला. सध्या ११ सदस्यीय कुर्टी-खांडेपार पंचायतीत मगोच्या बाजूने सहा पंच असल्याने पंचायतीत सत्ताबदल निश्चित असून सरपंचपदाची माळ सुप्रिया गावडे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. माजी उपसरपंच नागेश नाईक तसेच पंचसदस्य सज्जाद मुल्ला, नावेद तहसीलदार, दीपा शंकर नाईक, सुप्रिया गावडे आणि घरवापसी केलेले नरेंद्र परब यांनी अविश्वास ठराव आणला आहे. (प्रतिनिधी)