पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, त्यात २६ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांपैकी एक आहे, सईद अदिल हुसैन शाह. अदिलच्या हत्येमुळे त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. अदिलची हत्या झाल्याचे कळताच त्याच्या आईने आणि पत्नी टाहो फोडला. त्याचे वडील म्हणाले की, तो एकमेव कमावता होता. आम्हाला न्याय हवाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या सईद अदिल हुसैन शाह याच्या वडिलांना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले. सईद हैदर शाह असे मयत तरुणाच्या वडिलांचे नाव आहे. 'माझा मुलगा निर्दोष होता. त्या भेकडांनी त्याला मारून टाकलं', असे ते म्हणाले.
अदिल करायचा घोडे चालवण्याचे काम
सईद हैदर शाहांनी सांगितले की, 'माझा मुलगा पर्यटकांना घोड्यावरून ने-आण करायचा. मंगळवारी तो पर्यटकांना घेऊन येण्यासाठी गेला होता. मला दुपारी तीन वाजता कळले की, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.'
वाचा >>पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
'हल्ला झाल्याचे कळताच मी त्याला कॉल केला, पण त्याचा मोबाईल बंद येत होता. काही वेळाने मी पुन्हा कॉल केला. कॉल लागला पण, उचलत नव्हता. त्यामुळे मी लगेच पोलीस ठाण्यात गेलो आणि तक्रार दिली', असे सईद हैदर शाह म्हणाले.
जाऊन बघितलं तर त्याचा मृत्यू झाला होता
शईद हैदर शाह म्हणाले, 'मला नंतर कळलं की, तो जखमी झाला आहे आणि त्याला रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यामुळे मी रुग्णालयात गेलो. तिथे जाऊन बघितलं तर त्याचा मृत्यू झाला होता.'
घरात तोच कमावणारा होता
'माझा मुलगा निर्दोष होता. त्याला का मारलं? घरात सगळे लहान आहेत. तो मोठा होता आणि घरात तोच कमावता व्यक्ती होता. पर्यटकांना घोड्यावरून ने-आण करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. त्याचं लग्न झालंय. आम्हाला न्याय हवाय. ज्याने कुणी त्याची हत्या केली त्याला शिक्षा झाली पाहिजे', असे सईद हैदर शाह म्हणाले.