Pahalgam Attack Update in Marathi: पहलगाममधील हल्ल्यात पतीला गमावणारी महिला कोलकातामध्ये पोहोचली तेव्हा तिला दुःख अनावर झाले. माझ्या मुलासमोर त्यांनी माझ्या पतीला गोळ्या घातल्या. मी माझ्या मुलाला कसं सांगू आता त्याचे वडील परत येणार नाहीत, असे म्हणत या महिलेने टाहो फोडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पर्यटनासाठी गेलेल्यांनाच अतिरेक्यांनी लक्ष्य केले. कुटुंबीयांच्या समोरच दहशतवाद्यांनी अनेकांवर गोळ्या झाडल्या. यात २६ जण मरण पावले. त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवले गेले. या मृतांमध्ये एक आहेत. बीतन अधिकारी.
पश्चिम बंगालचे असलेले बीतन अधिकारी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते अमेरिकेत नोकरीला आहेत. सुट्टी घेऊन ते भारतात आले होते आणि पत्नी व मुलासह काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. पण, काश्मीरमध्येच त्यांना प्राण गमवावा लागला.
'मम्मी, पप्पाला त्यांनी गोळ्या मारल्या'
'माझ्या मुलासमोर त्यांनी माझ्या पतीला गोळ्या घातल्या. माझा मुलगा दचकून उठतो. जेव्हा पण झोपेतून उठतो, तेव्हा बोलतो की, मम्मी, त्या लोकांनी पप्पांना गोळ्या मारल्या. माझ्यासमोरच त्यांनी मारले. मी त्याला कसं समजावून सांगू की, आता त्याचे वडील कधीच परत येणार नाही. माझं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे', असे म्हणत बीतन अधिकारींच्या पत्नीने टाहो फोडला.
बीतन अधिकारी यांना इतर पर्यटकांप्रमाणेच बाजूला उभं करण्यात आले आणि गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हे सगळं त्यांची पत्नी आणि मुलासमोर घडलं. या घटनेचा त्यांच्या मुलावर मोठा आघात झाला आहे. बीतन अधिकारी यांच्या आई-वडिलांच्या मनावरही मोठा आघात झाला आहे.
त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या
बीतन अधिकारींच्या पत्नीने सांगितलं की, ज्यावेळी हा हल्ला झाला; त्यावेळी तिथे पर्यटकांची संख्या खूप होती. दहशतवाद्यांनी आधी काश्मीरच्या बाहेरून आलेल्यांना वेगळे उभे केले. त्यानंतर धर्म विचारून त्यांना वेगळं केलं. कुटुंबांसोबत आलेल्या पुरुषांना बाजूला उभं केले आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या.