Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून सुमारे २६ पर्यटकांची हत्या केली. यानंतर आता दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अनेक देशांच्या राजदूतांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सुरू असलेल्या घडामोडींची सविस्तर माहिती दिली. भारताने पाकिस्तानवर काही निर्बंध लादल्यानंतर थयथयाट झालेल्या पाकनेही प्रत्युत्तर म्हणून काही निर्णय जाहीर केले. या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशभरातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. यातच भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी एक्सवर एक पोस्ट करत, कलमा वाचायला शिकत असल्याचे म्हटले आहे.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून तसेच कलमा पढण्यास सांगून पर्यटकांवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहतवाद्यांनी पर्यटकांची धार्मिक ओळख पटवून निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. अशा प्रकारे पर्यटकांवर हल्ला झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात असले, तरी यापूर्वीही धर्म विचारून काश्मीरवासीयांवर अत्याचार केल्याच्या, हत्या केल्याच्या घटना घडल्याचे म्हटले जात आहे. या हल्लात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. तसेच पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. बैठकांचे सत्र सुरू असतानाच भाजपा खासदाराने केलेल्या पोस्टमुळे वेगळीच चर्चा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता कलमा वाचायला शिकत आहे, कधी कामी येईल माहिती नाही
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये “अशहदु अल्लाह इल्लाह इल्लल्लाहु वह दहु ला शरी-क लहू व अशदुहु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु”, असे लिहून सध्या कलमा पढायला शिकत आहे. कधी याचा उपयोग होईल माहिती नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या हत्याकांडातून चातुर्यामुळे बचावलेल्या प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांनी सांगितले की, माझ्या आजूबाजूला प्रत्येक जण कलमा पढत होता. तेवढ्यात एका दहशतवाद्याने माझ्यावर बंदूक रोखली. माझे बोलणे ऐकले आणि निघून गेला. मी केवळ ‘ला इलाही’चा जप करत होतो. साधारणपणे १४५० वर्षांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांनी इस्लामच्या अनुयायांसाठी कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज या पाच तत्त्वांचा उपदेश केला. यातमधील पहिला उपदेश हा ‘कलमा’बाबत आहे. इस्लाममध्ये कलमा याचा अर्थ शहादत म्हणजेच शपथ असा होतो. तसेच इस्लामच्या अनुयायांसाठी तो महत्त्वपूर्ण आहे.