गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 21:46 IST2025-04-24T21:46:20+5:302025-04-24T21:46:57+5:30

Pahalgam Terror Attack: बैठकीत सर्व विरोधी पक्षांनी एकमताने सरकारच्या बाजूने उभे असल्याचे सांगितले.

Pahalgam Terror Attack: Error in intelligence system; Government admits mistake regarding Pahalgam attack | गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...

गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. याशिवाय, या घटनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीतील सर्व पक्षांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. यावेळी सरकारने सुरक्षेत चूक झाल्याचे मान्य केले. 

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "ही एक अतिशय दुःखद घटना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये लोक शांततेत आपले व्यवसाय करत होते, पर्यटक येत होते, सर्व काही अगदी व्यवस्थित सुरू होते. पण, नेमकी कुठे चूक झाली, हे आम्ही शोधून काढू. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी एका सुरात सरकारच्या बाजूने असल्याचे आणि सरकारच्या सर्व निर्णयांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. 

सैन्य का तैनात नव्हते?
बैठकीत विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केला की, ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक आले होते, तिथे सैन्य किंवा सुरक्षा का तैनात नव्हती? तसेच, गुप्तचर संस्था काय करत होत्या? बहुतांश पक्षांनी गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी आणि तेथे योग्य सुरक्षा तैनातीचा मुद्दा उपस्थित केला. 

यावर सरकारने सांगितले की, साधारणपणे जून महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू होते, अमरनाथ यात्रेचे यात्रेकरू या ठिकाणी विश्रांती घेतात, तेव्हाच हा मार्ग उघडला जातो आणि या भागात सैन्य तैनात करण्यात येते. पण, यंदा स्थानिक टूर ऑपरेटर्सनी खूप लवकर सरकारला न कळवता पर्यटकांचे बुकिंग घेण्यास सुरुवात केली, त्यामुळेच 20 एप्रिलपासून पर्यटकांनी तिथे येणे सुरू केले. स्थानिक अधिकाऱ्यांनाही याची माहिती नव्हती आणि त्यामुळे तिथे सैन्याची तैनाती करण्यात आली नाही, अशी माहिती सरकारने दिली.

बैठकीला कोणते नेते उपस्थित होते?
सर्वपक्षीय बैठकीत सरकारच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते. तर, विरोधकांकडून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीसह अनेक नेते उपस्थित होते.

Web Title: Pahalgam Terror Attack: Error in intelligence system; Government admits mistake regarding Pahalgam attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.