पहलगाम - आठवड्यापूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकलेले विनय नरवाल आणि त्यांची पत्नी आपल्या नव्या वैवाहिक आयुष्याची स्वप्न रंगवत होते. परंतु काही दिवसांतच त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. लग्न झाल्यानंतर हनीमूनसाठी हे कपल काश्मीरला फिरायला गेले होते. परंतु जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं या दोघांच्या नात्याला नजर लागली आणि दहशतवादी हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला. काश्मीर खोऱ्यात पती विनयच्या मृतदेहाशेजारी बसून रडणाऱ्या नव्या नवरीचा फोटो पाहून प्रत्येकाचे डोळे पाण्याने भरले.
पहलगाम इथं मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. याठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले. ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला. २० हून अधिक लोक या हल्ल्यात जखमी झालेत ज्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांची कहाणी आता समोर येत आहे. या मृतांमध्ये नौदलात लेफ्टिनंट पदावर कार्यरत असणाऱ्या विनय नरवालचं अलीकडेच लग्न झाले होते.
दहशतवादी हल्ल्यात विनयचा मृत्यू झाला त्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तरूण मुलाच्या मृत्यूने वडील खचले आहेत. त्याही परिस्थितीत मुलाचा मृतदेह आणण्यासाठी ते पहलगामला गेलेत. विनयच्या मृत्यूमुळे नरवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुणीही काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाही. या दहशतवादी हल्ल्याचा कठोर बदला घ्यावा अशी मागणी गावकरी करत आहेत. जर दहशतवाद्यांना असेच सोडले तर ते पुन्हा हल्ला करण्याचं धाडस करतील अशी संतप्त भावना लोकांमध्ये आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा जवानांकडून काश्मीर खोऱ्यात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
पहलगाम हल्ल्यावेळी काही दहशतवादी खोट्या पोलीस गणवेशात आले होते. सुरुवातीला कुठल्याही पर्यटकांना त्यांच्यावर शंका आली नाही. परंतु थोड्याच वेळात जेव्हा त्यांनी हिंदू पर्यटकांना नाव विचारून हल्ला सुरू केला तेव्हा घटनास्थळी गोंधळ झाला. प्रत्येक जण जीव मुठीत धरून पळू लागले. दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक हिंदू पुरुषांना टार्गेट केले जे पत्नीसोबत, कुटुंबासोबत फिरायला आले होते. या हल्ल्याचे फोटो, व्हिडिओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओत ज्या महिलांच्या पतीवर हल्ला झाला त्या धायमोकलून रडताना दिसत आहेत.