नवी दिल्ली - पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या भीषण हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या देशावर भारताने बुधवारी कायदेशीर स्ट्राइक केला. सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया जोवर थांबत नाहीत तोवर दोन्ही देशांतील सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयांतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ५५ वरून ३० वर आणली जाणार आहे.
अटारी-वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळ बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. मात्र, तिथून प्रवेश केलेल्या पाकिस्तानी नागरिकांना येत्या १ मेपर्यंत भारतातून पुन्हा त्यांच्या मायदेशात परत जाता येईल असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्त कार्यालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संपर्काधिकाऱ्यांना एक आठवड्याच्या आत भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या उच्चायुक्त कार्यालयांतील पाच सहायक कर्मचाऱ्यांनाही माघारी बोलाविण्याचा आदेश भारताने दिला. हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत बुधवारी झालेल्या निर्णयांची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी दिली.
१९६० सालापासूनचा सिंधू जलवाटप करार केला स्थगित
अटारी-वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळ बंद करण्याचा निर्णय
पाकिस्तानच्या उच्चायुक्त अधिकाऱ्यांना आठवड्याच्या आत भारत सोडण्याचा आदेश
पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासात जावे लागेल परत; भारताने दिली डेडलाईन पाकिस्तानी नागरिकांना सार्क वीजा सवलत योजने अंतर्गत भारतात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना पूर्वी जारी करण्यात आलेले कोणतेही असे व्हिसा आता रद्द मानले जातील. सध्या या व्हिसावर भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी केवळ ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे.
पाकिस्तानची आज बैठकभारताने केलेल्या जोरदार कारवाईनंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले असून, पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी रात्री सांगितले की, या निर्णयाला उत्तर देण्यासाठी उद्या गुरुवारी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली जाईल.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यतापहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दहशतवादी हल्ले घडविणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात आणखी काय पावले उचलायची याबद्दल विविध राजकीय पक्षांची मते केंद्र सरकार जाणून घेईल. हल्ल्यानंतर काश्मीरमधील स्थितीबाबत सरकार या बैठकीत माहिती देईल, असे कळते.