Deputy CM Eknath Shinde In Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून सुमारे २६ पर्यटकांची हत्या केली. दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अनेक देशांच्या राजदूतांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि घडामोडींची सविस्तर माहिती दिली. एकीकडे भारताकडून पाकविरोधात कठोर निर्णय घेतले जात असताना दुसरीकडे सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. यातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला पोहोचले आहेत.
भाजपा नेते गिरीश महाजन हेही जम्मू काश्मीर येथे गेले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक मंत्र्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जम्मू काश्मीरला जात पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
१८४ जणांना सुखरूप पाठवले, जखमींची विचारपूस केली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकून पडलेल्या पर्यटकांपैकी १८४ पर्यटकांना मुंबईला घेऊन जाणारे दुसरे विमान श्रीनगरहून मुंबईकडे रवाना झाले. श्रीनगर येथून रवाना होण्यापूर्वी या पर्यटकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि सुरक्षित प्रवासासाठी या सर्वांना आश्वस्त करून निरोप दिला, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरींदर कुमार चौधरी यांची भेट घेऊन चर्चा केली. पर्यटकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत पाठवण्यास सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे येथील रहिवाशी सुबोध पाटील हे श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. तेथे जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली व लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन घरी परतावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.