Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. या घटनेत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाहा यांनी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि त्यानंतर तात्काळ श्रीनगर गाठले.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या 'द रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) या आघाडीच्या संघटनेने घेतली आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून या दहशतवादी संघटना छोट्या 'हिट स्क्वॉड्स' वापरून दहशतवादी हल्ले करतात. अमरनाथ यात्रेपूर्वी आजच्या हल्ल्याद्वारे भाविकांमध्ये भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, टीआरएफचे 'हिट स्क्वॉड' आणि 'फाल्कन स्क्वॉड' येत्या काळात काश्मीरमध्ये मोठे आव्हान निर्माण करू शकतात. या दहशतवादी मॉड्यूलला टार्गेट किलीग आणि जंगलात लपण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सुरक्षा दलांवर हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला होता. इंटेलने सोशल मीडियाद्वारे फाल्कन स्क्वॉडमध्ये भरती करण्याबाबत गुप्त माहिती दिली होती. हे पथक 'ओव्हरग्राउंड वर्कर्स' सोबत "हिट अँड रन" युक्त्यांसह काम करते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'द रेझिस्टन्स फ्रंट' हा लष्कर-ए-तैयबाचा एक प्रॉक्सी गट आहे. 'फाल्कन स्क्वॉड' हे त्याच्या मॉड्यूलपैकी एक आहे.
टीआरएफ 2019 मध्ये अस्तित्वात आला. ही संघटना स्थापन करण्याचा कट सीमेपलीकडून रचण्यात आला होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगभर उघडकीस आला. हा हल्ला जैश-ए-मोहम्मदने केला होता. जेव्हा जगभरातून पाकिस्तानवर दबाव वाढला, तेव्हा पाकिस्तानने लहान संघटना स्थापन करण्याची योजना आखली.
याद्वारे भारतात दहशत पसरवली जाते आणि पाकिस्तानचे नावही येत नाही. 2020 मध्ये कुलगाममधील हत्याकांडानंतर टीआरएफचे नाव पहिल्यांदा समोर आले. त्यावेळी भाजप कार्यकर्ते फिदा हुसेन, उमर रशीद बेग आणि उमर हजाम यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. असे म्हटले जाते की, टीआरएफ काश्मीरमध्ये 90 च्या दशकात असलेला तोच दहशतवादाचा काळ परत आणू इच्छिते.