जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. देशातील विविध राज्यांतील लोक 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखली जाणारी बैसरन व्हॅली फिरण्यासाठी आले होते. त्यापैकीच कोलकात्याचा रहिवासी बिटन अधिकारी हा एक होता. बिटन गेल्या १० वर्षांपासून अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहत होता. तो अवघ्या १० दिवसांपूर्वीच कोलकाता येथील त्याच्या घरी आला होता. कुटुंबासह पहलगामला फिरण्यासाठी आला होता पण दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली.
४० वर्षीय बिटन फ्लोरिडामध्ये काम करत होता.पत्नी सोहिनी (३७) आणि तीन वर्षांचा मुलगा हृदानसह उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी तो त्याच्या मूळ गावी कोलकाता येथे आला होता. तिथे त्यांनी काश्मीरला फिरायला जाण्याचा प्लॅन केला. २४ एप्रिल रोजी तो काश्मीरहून परत येणार होता. पण दहशतवादी हल्ल्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात बिटनची पत्नी आणि मुलगा थोडक्यात वाचले आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये हल्ल्याची माहिती शेअर केली आणि सांगितलं की हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ३ जण त्यांच्या राज्यातील होते. पीडित कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करताना ममता म्हणाल्या की, मी बिटनच्या पत्नीशी फोनवर बोलले आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. मी त्यांना आश्वासन दिलं आहे की, सरकार त्याचं पार्थिव कोलकाता येथील घरी परत आणण्यासाठी सर्वोतोपरी पावलं उचलत आहे.
माध्यमांशी बोलताना बिटनच्या वडिलांनी सांगितलं की, मुलगा आम्हाला सर्वांना त्याच्यासोबत घेऊन जाणार होता. पण मी त्याला त्याच्या पत्नीसोबत जाण्यास सांगितलं. मी दुपारी माझ्या मुलाशी बोललो होतो. पण त्यानंतर हे सर्व झालं आहे. बिटनच्या भावाने सांगितलं की, मी माझ्या धाकट्या भावाशी बोललो. तो म्हणाला की, काश्मीरहून परतल्यानंतर आपण एका लाँग व्हेकेशनचा प्लॅन करू. मला माहित नव्हतं की, हे आमचं शेवटचं संभाषण असेल.
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडल्या गोळ्या
जम्मू-काश्मीरमधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील एका कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला आहे. दहशतवाद्यांनी ४१ वर्षीय प्रशांत सतपथी यांची गोळ्या घालून हत्या केली. रोपवेवरून उतरत असताना पत्नी आणि ९ वर्षांच्या मुलासमोरच ही भयंकर घटना घडली. प्रशांत हे बालासोर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) येथे अकाउंट्स असिस्टंट म्हणून काम करत होते. या काश्मीर ट्रिपला जाण्यासाठी त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे साठवले होते.