जम्मू-काश्मीरमधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील एका कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला आहे. दहशतवाद्यांनी ४१ वर्षीय प्रशांत सतपथी यांची गोळ्या घालून हत्या केली. रोपवेवरून उतरत असताना पत्नी आणि ९ वर्षांच्या मुलासमोरच ही भयंकर घटना घडली.
प्रशांत हे बालासोर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) येथे अकाउंट्स असिस्टंट म्हणून काम करत होते. या काश्मीर ट्रिपला जाण्यासाठी त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे साठवले होते. आपल्या कुटुंबासह ते काश्मीरमध्ये आले होते.
दहशतवाद्यांनी डोक्यात झाडली गोळी
प्रशांत यांची पत्नी प्रियदर्शिनी आचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते रोपवेवरून खाली उतरत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. प्रशांत तिथेच खाली पडले, या घटनेच्या एक तासानंतर पोलीस आणि जवान आले. प्रशांत यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या गावामध्ये शोककळा पसरली.
कुटुंबीयांना मोठा धक्का
कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यामुळे प्रशांत यांची आई काहीच बोलत नाही, असं भाऊ सुशांत सतपथी यांनी सांगितलं आहे. प्रशांत काश्मीरला जाण्यासाठी खूप उत्सुक होते असंही म्हटलं आहे. दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
हरियाणाच्या विनय नरवाल याचाही पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय विनय नेव्हीमध्ये अधिकारी होता. ७ दिवसांपूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी त्याचं हिमांशीशी लग्न झालं होतं. हनीमूनसाठी ते पहलगामला गेले होते. मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला आहे. यानंतर पत्नीने आता विनयला अखेरचा निरोप दिला आहे.विनयच्या पत्नीने शवपेटीला मिठी मारली. खूप रडली. शेवटी सॅल्यूट करून तिने जयहिंद असं म्हटलं आहे.