पहलगाम दहशतवादी हल्ल्याने जगाला हादरवले आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटनाला गेलेल्या लोकांवर गोळ्या झाडल्या आहेत. आज या पर्यटकांचे मृतदेह त्यांच्या त्यांच्या गावी आले आहेत, आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यांच्या अंत्यसंस्काराची आग विझणार नाही तोवर पाकिस्तानचा बदला घेण्याची जोरदार मागणी होत आहे. देशवासियच नाहीत तर मृत नागरिकांचे नातेवाईकही ही मागणी करत आहेत. बदल्याची आग सर्वांच्या हृदयात पेटलेली आहे. अशातच पाकिस्तान देखील रात्रभर दहशतीत आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी भारतीयांविरोधात गरळ ओकली होती. आता भारताची जोरदार प्रत्यूत्तर देण्याची वेळ आली आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे भारत आता हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची गाळण उडाली आहे. भारत गेल्यावेळसारखा पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसू शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. यामुळे पाकिस्तानी एअरफोर्सने अख्खी रात्र जागून काढली आहे. पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी मंगळवारी सायंकाळी तिन्ही दलांची बैठक घेतली. यानंतर लगेचच चिनी बनावटीची १८ लढाऊ विमाने एलओसीच्या दिशेने पाठविण्यात आली होती.
ही लढाऊ विमाने सीमेवरील एअरबेस लाहोर आणि रावळपिंडीमध्ये तैनात करण्यात आली आहेत. तसेच पीओकेमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या लाँच पॅडवर भारत पुन्हा मोठा हल्ला करण्याची शक्यता पाकिस्तानला वाटत आहे. यामुळे पाकिस्तानने एलओसीवर सैन्य वाढविण्यास सुरुवात केली आहे. तसेच अरबी समुद्रात पाकिस्तानने फायरिंग एक्सरसाईज करण्यास सुरुवात केली आहे.
भारत जमिनीवरून हल्ला करणार नाही, असे मुनीर यांना वाटत आहे. यामुळे हवाई हल्लाच होईल असा त्यांचा अंदाज आहे. यामुळे सर्व २० फायटर जेट स्क्वाड्रनना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने महत्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील अमेरिकेतील दौऱ्यावरून माघारी निघाले आहेत. या बैठकीनंतर पाकिस्तानवर कारवाईचे स्वरुप स्पष्ट होणार आहे.