पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानवर कायदेशीवर स्ट्राईक लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानविरोधात ५ मोठे निर्णय घेण्यात आलेत. त्यात भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिलेला व्हिसा रद्द केला असून भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिलेत. जे व्हिसा धारक आहेत त्यांना १ मे पर्यंत पाकिस्तानात जाता येणार आहे.
भारत सरकारच्या या आदेशानंतर सर्वात जास्त चर्चा पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर या महिलेची होत आहे. सीमा हैदर भारतीय नागरिक सचिन मीणाच्या प्रेमात पडून पाकिस्तानसोडून भारतात आली होती. इथे तिने सचिनसोबत लग्न केले. आता भारत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानात परतावं लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेपाळमार्गे भारतात आली होती
सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली होती. सर्वात आधी ती पर्यटक व्हिसा घेऊन पाकिस्तानच्या शारजहातून नेपाळला पोहचली. नेपाळमध्ये काही दिवस घालवल्यानंतर काठमांडू टू दिल्ली बसमध्ये प्रवास करत ती चार मुलांसह भारतात पोहचली. याठिकाणी सीमा हैदरने सचिन मीणासोबत लग्न केले तेव्हापासून सीमा हैदर भारतात राहत आहे. सीमा आणि सचिन यांची याआधी यूपी एटीएसने चौकशी केली आहे.
सीमाला परत जावं लागणार?
पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश सरकारने दिल्यानंतर सीमा हैदरलाही परत जावे लागणार का हे येणाऱ्या काळात कळेल. सीमा हैदर भारतात कुठल्याही व्हिसा आणि पासपोर्टशिवाय पोहचली होती. तिचे प्रकरण अद्याप कोर्टात प्रलंबित आहे. सीमा हैदरने भारतीय नागरिक सचिन मीणासोबत लग्न केले आहे. जर यूपी सरकार या प्रकरणी सीमा हैदरविरोधात गुन्हा दाखल करून तिला विना व्हिसा, पासपोर्ट भारतात आल्याबद्दल शिक्षा होऊ शकते अथवा तिला पुन्हा पाकिस्तानात सोडले जाऊ शकते. सीमा हैदरने भारतीय नागरिकत्व मिळावे अशी मागणीही केली आहे.
तज्ज्ञ काय सांगतात?
दिल्ली हायकोर्टाचे वकील अबू बकर यांनी सांगितले की, सर्व पाकिस्तानी नागरिकांना कुठल्याही स्थितीत भारत सोडावा लागेल. त्यामुळे सीमा हैदरलाही भारतातून जावे लागेल. परंतु हे करणे सोपे नाही. सीमा हैदरला भारतात राहण्याची परवानगी द्यायची की नाही हे राज्य सरकारवर अवलंबून आहे. सीमा हैदरने भारतीय नागरिकाशी लग्न केले आहे. सचिन मीणाशी लग्न करून तिला १ मुलगाही झाला आहे. त्यामुळे यूपी सरकारच्या रिपोर्टवर सीमा हैदरवर कारवाई होणार की नाही हे स्पष्ट होईल.