जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी असल्याचे समजते. महत्वाचे म्हणजे, त्या कट्टरपंथी दहशतवाद्यांनी धर्म विचारून, कलमा पढायला सांगून, या निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर, अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारे काही प्रसंगही समोर येत आहे.
जेव्हा दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात हल्ला केला, तेव्हा लोक भयभीत होऊन तंबूत लपले होते. दहशतवादी पर्यटकांवर निर्दयीपणे गोळीबार करत होते. यावेळी पुण्यातील व्यावसायिक संतोष जगदाळे आणि त्यांचे कुटुंबही जीव वाचवण्यासाठी तंबूत लपले. मात्र, दहशतवाद्यांनी या ५४ वर्षीय व्यावसायिकाला तंबूतून बाहेर काढले आणि एक आयत म्हणायला सांगितली. मात्र त्यांना ती म्हणता आली नाही. यानंतर, दहशतवाद्यांनी जगदाळे यांच्यावर गोळ्या झाडल्या.
जगदाळे यांच्या मुलीने सांगितला भयावह प्रसंग - व्यावसायिक जगदाळे यांची मुलगी असावरी म्हणाली, एका टेकडीवरून खाली उतरताना आम्हाला गोळीबार होत असल्याचा आवाज आला. आई (प्रगती) आणि वडील (संतोष जगदाळे) आम्ही इतर पर्यटकांसह जवळच्याच एका तंबूत धावलो. आम्हाला वाटले की हल्लेखोर आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. मात्र, काही वेळातच एक भयावह आदेश आला. "तू बाहेर ये." हल्लेखोरांनी तिच्या वडिलांना तंबूतून बाहेर खेचले आणि नंतर त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा आरोप लावला.
'हिंदू आहात की मुस्लीम' -आसावरी म्हणाली, जवळपास बरेच पर्यटक होते. मात्र, दहशतवाद्यांनी पुरुषांनाच लक्ष्य केले आणि हिंदू आहात, की मुस्लीम? असे विचारले. २६ वर्षीय आसावरी म्हणाली, 'यानंतर त्यांनी माझ्या वडिलांना एक इस्लामिक आयत (कदाचित कलमा) म्हणायला सांगितले.' मात्र, त्यांना ते म्हणता आले नाही. यानंतर त्यांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या, एक डोक्यात, एक कानाच्या मागे आणि एक पाठीवर. यानंतर, बंदूकधाऱ्यांनी तिच्या काकांकडे बघितले आणि त्यांच्यावर जोरदार गोळीबार केला. यानंतर साधारणपणे २० मिनिटांनी पोलीस आणि सुरक्षा रक्षक घटनास्थळी पोहोचले.या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.