Pahalgam Attack: जम्मू-काश्मिरातील पहलगाम इथं पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २६ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या करणाऱ्या नराधम दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून वेगवान मोहीम राबवली जात आहे. अशातच प्रशासनाकडून यातील तीन दशतवाद्यांचे स्केच जारी करण्यात आलं आहे.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशासनाने तीन दहशतवाद्यांचे स्केच तयार करून जारी केले आहेत. या दहशतवाद्यांचा शोध घेऊन खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराकडून पहलगामच्या जंगलात विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं जात असल्याची माहिती आहे.
हल्ल्यानंतर दहशतवादी कुठे लपले?
पहलगाम इथं पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांचा जीव घेतल्यानंतर हे दहशतवादी जंगलातून त्यांच्या सुरक्षित अड्ड्यावर गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहलगामच्या जंगलात सुरक्षा यंत्रणांकडून जोरदार शोध मोहीम सुरू आहे. भारतीय लष्करासह जम्मू-काश्मीर पोलीसही या नराधमांचा शोध घेत आहेत. गृहमंत्र्यांकडून पीडितांची भेट
पहलगाम येथील हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तातडीने जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले असून आज सकाळी त्यांनी या हल्ल्यातील पीडितांची भेट घेतली. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भेटत शाह यांनी त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, अमित शाह यांच्या या भेटीवेळी पीडितांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचं पाहायला मिळालं.