पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. देशवासीयांना दहशतवाद्यांचा समूळ नाश हवा आहे. दहशतवाद्यांचे असे हाल करणार, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधून आज केली. पाकिस्तानच्या सीमेवरील लक्ष अधिक वाढले आहे. पाकिस्ताननेही आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यांची लढाऊ विमाने रात्रभर आकाशात घिरट्या घालत होती. आता केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक होत आहे. या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. या बैठकीसाठी एआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनाही बोलावण्यात आले आहे.
हैदराबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना लोकसभा खासदार ओवेसी म्हणाले, आपल्याला गृह मंत्रालयाकडून फोन आला होता. गृहमंत्री अमित शाह फोनवर होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीसाठी अमित शहा यांनी आपल्याला तातडीने दिल्लीला बोलावले आहे. ओवेसी पुढे म्हणाले, "हा दहशतवादी हल्ला केलेल्या या कुत्र्यांना शिक्षा मिळणे आवश्यक आहे. खरे तर, यांच्या वर बसलेले यांचे जे 'आका' आहेत, ज्यांना काश्मीर आणि भारतात नेहमीच अशांत रहावा असे वाटते. त्यांना मुळांपासून धडा शिकवण्याची गरज आहे."
ओवेसी म्हणाले, 'हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. मी सर्व पक्षांना यासाठी आमंत्रित करावे अशी मागणी केली होती. मी पत्रकार परिषद घेत असतानाच मला गृहमंत्र्यांचा फोन आला. 'ते म्हणाले- आपण कुठे आहात? मी म्हणालो- हैदराबादमध्ये. ते म्हणाले- उशीर होईल पण तुम्ही या.' जर मला तिकीट मिळाले तर... मला जे काही तिकीट मिळेल त्याने मी जाईन आणि सहभागी होईल." तसेच, दुसरीकडे, भारत सरकारने दिल्लीत तैनात असलेल्या परदेशी राजदूतांना परिस्थितीची माहिती देण्यासाठी बोलावले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सर्व नेत्यांना घटनेची सविस्तर माहिती देतील. तसेच, पुढील रणनीती आणि कृतींवर नेत्यांचे मत देखील घेतले जाऊ शकते.