Pahalgam Terrorist Attack Helpline Number: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याबाबत वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अंदाजे ३० जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी दक्षिण काश्मीरमधील पहलगाममधील बैसरनच्या गवताळ प्रदेशात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. त्यावेळी सुमारे ३ वाजता अचानक गोळीबार झाला आवाज आला आणि सर्वत्र आरडाओरडा झाला. हल्ल्यानंतर, पर्यटकांना मदत आणि माहिती देण्यासाठी आपत्कालीन मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी ९५९६७७७६६९, ०१९३२२२५८७० (९४१९०५१९४० व्हाट्सअप) हे हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, दोषींना सोडले जाणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी श्रीनगरला पोहोचले आहेत. दहशतवाद्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हा अलिकडच्या काळात नागरिकांवर झालेला सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली.
हिंदूंना कलमा पढण्यास भाग पाडलं...
आसावरी यांनी आजतकला सांगितले की, दहशतवादी स्थानिक पोलिसांच्या गणवेशात आले होते आणि त्यांनी मास्क घातले होते. त्यांनी फक्त पुरुषांना लक्ष्य केले आणि विशेषतः हिंदूंना कलमा म्हणण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. ज्यांना वाचता येत नव्हते, त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. माझ्या वडिलांना माझ्यासमोर तीन गोळ्या घालण्यात आल्या. माझ्या काकांनाही गोळ्या लागल्या. आम्ही तंबूच्या मागे लपलो होतो. स्थानिक लोकांनी दहशतवाद्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पाहून आम्ही घाबरलो आणि आम्हीही कलमा पढायला लागलो आणि तेथून पळून गेलो. आम्ही घोड्यांवरून पळून कसाबसा जीव वाचवला.