Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर अनेक पर्यटक जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचे समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लगेचच जम्मू काश्मीरला रवाना झाले आहे आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला असून, यापैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहेत. या हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावलेल्या काही पर्यटकांनी आपल्यावर घडलेल्या प्रसंगाची आपबीती सांगितली आहे.
समोर मृत्यू उभा असताना केवळ दैव बलवत्तर म्हणून जीव वाचलेल्या एका प्रोफेसरने या भ्याड हल्ल्यावेळी त्यांच्यासोबत काय घडले, हे सांगितले. देबाशिष भट्टाचार्य हे आसाम विद्यापीठात बंगाली विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत. प्रोफेसर भट्टाचार्य हे आपल्या कुटुंबासोबत जम्मू काश्मीर येथे फिरायला गेले होते. एका झाडाखाली बसले असताना अचानक गोळीबार सुरू झाला आणि काही कळाच्या आतच एक दहशतवादी समोर येऊ उभा राहिला. परंतु, कलमा वाचल्यामुळे अगदी थोडक्यात वाचलो, अशी अंगावर शहारा आणणारी आपबीती प्रोफेसर भट्टाचार्य यांनी सांगितली.
नेमके काय घडले?
पहलगाम येथील हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावलेल्या प्रोफेसर भट्टाचार्य यांनी त्यावेळेस नेमके काय घडले, याची माहिती दिली. आम्ही झाडाखाली बसलो होतो. तेवढ्यात समोर विस्तीर्ण पसरलेल्या मैदानातून मोठ्याने कलमा वाचला जात असल्याचा आवाज येऊ लागला. काहीच कळायला मार्ग नव्हता. अचानक गोळीबार सुरू झाला. हे सगळे सुरू असताना एकदम समोर येऊन एक दहशतवादी उभा राहिला. मागे उभ्या असलेल्या माणसाच्या डोक्यात त्याने गोळी घातली आणि तुम्ही काय करताय, असे विचारू लागला. त्याक्षणी काहीच सुचले नाही, तेव्हा मीही मोठ्याने कलमा वाचायला सुरुवात केली. काही क्षण दहशतवादी आमच्या समोरच उभा होता. परंतु, काय झाले माहिती नाही, तो दहशदवादी तिथून पुढे निघून गेला. माझी बायको आणि मुलाला घेऊन तडक तिथून वेगाने चालायला सुरुवात केली. मागे वळूनही पाहिले नाही आणि डोंगराच्या दिशेने चालायला सुरूवात केली, असे प्रोफेसर भट्टाचार्य यांनी सांगितले.
दरम्यान, सुमारे दोन तास चालल्यानंतर एक लोखंडी जाळी दिसली. ती पार करून पुढे गेलो. तिथेच काही गेल्यानंतर एक घोडेस्वार दिसला. आम्ही काहीच सांगण्याची मनस्थितीत नव्हतो. त्याला अनेक विनवण्या करून सर्वप्रथम हॉटेल गाठले. तिथून सायंकाळी पोलीस स्थानकात जाऊन आमच्यावर घडलेला प्रसंग सगळी शक्ती एकवटून सांगितला, असे प्रोफेसर भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.