मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातील प्रवास संपला आहे. मात्र, राहुल गांधींनी महाराष्ट्रात येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यामुळे ही यात्रा देशभरातील माध्यमांत चर्चेचा विषय ठरली. त्यातच, महाराष्ट्रात काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यात सहभाग नोंदवला होता. त्यावरुन, भाजप नेत्यांनी राहुल गांधींच्या यात्रेवर टिका केली. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी कलाकारांना पैसे देण्यात आल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केला होता. आता, या आरोपाला स्वत: यात्रेत सहभागी झालेली अभिनेत्री पूजा भट्टने प्रत्युत्तर दिलं आहे.
भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमधून प्रवास करत आहेत. या दरम्यान, भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी ‘भारत जोडो यात्रे’वर आरोप करत राहुल गांधींवर टीका केली. तामिळनाडूतून सुरु झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’त अनेक कलाकरांनी हजेरी लावली. मात्र, यात्रेत सहभागी होण्यासाठी पैसे देऊन आणले जात असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. “भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने नौंटकी सुरु आहे. यात्रेत १५ मिनिटे चालून राहुल गांधींना पाठिंबा देणारे कलाकार पैसे देऊन आणण्यात आले का?,” असा सवाल नितेश राणेंनी एक स्क्रीनशॉट शेअर करत उपस्थित केला होता.
नितेश राणेंच्या ट्विटला रिट्विट करत या यात्रेत सहभागी झालेली अभिनेत्री आणि दिग्दर्शक पूजा भट्टने नितेश राणेंना विवेक शिकवला आहे. ''त्यांना असा विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी त्यांच्याबद्दल आदरही असायला हवा. पण, इतरांसोबत जगण्यापूर्वी स्वत:सोबत जगणं शिकायला हवं, एक गोष्ट जी बहुसंख्य लोकं पाळत नाहीतच, ती म्हणजे व्यक्तीची विवेकबुद्धी, असे म्हणत पूजा भट्ट यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
काय म्हणाले होते राणे
राणेंनी त्यात व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये नाव अथवा नंबर दिसत नाही. त्यावर नितेश राणेंनी लिहलं की, “भारत जोडो यात्रेत राहुल गांधींबरोबर चालण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले जातात, याचा हा पुरावा. सब गोलमाल है भाई… हा पप्पू कधी पास नाही होणार,” असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.