उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात ( (Uttarkashi Tunnel Collapse) 12 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्याचं काम अजूनही सुरू आहे. या बोगद्यात अनेक राज्यांतील कामगार अडकले आहेत. बोगद्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील रामसुंदर आणि संतोष यांच्या कुटुंबीयांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
बोगद्यात अडकलेल्या रामसुंदरच्या आईने एनडीटीव्हीशी संवाद साधला. "मोबाईल आणि टीव्हीच्या माध्यमातून बातम्या मिळत आहेत. माझा मुलगा 4 महिन्यांपूर्वी कामावर गेला होता. या घटनेमुळे घरात दिवाळी साजरी झाली नाही. आमचा मुलगा लवकर घरी परतला पाहिजे. आज 12 दिवस झाले. मात्र तो अद्याप परतला नाही. घरी कोणी जेवत नाही. सरकारने माझ्या मुलाला लवकरात लवकर बाहेर काढावं" असं म्हटलं आहे.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या संतोषच्या आईने सांगितलं की, "मला या घटनेची माहिती दिवाळीच्या दिवशी मिळाली. सरकारने मुलाला लवकर बाहेर काढावं. माझा लहान मुलगा मुलगा तिकडे गेला आहे. त्याने घटनेची माहिती दिली आहे." संतोषच्या बहिणीने सांगितलं की, घरी दिवाळी साजरी झाली नाही. तो घरी आल्यावर दिवाळी साजरी होईल. 5 महिने पूर्वी तो तिथे गेला होता.
40 रुग्णवाहिका, गॅस मास्क, डॉक्टर्स, हेलिकॉप्टर; बचाव मोहीम अंतिम टप्प्यात
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या 19 एजन्सी बचाव कार्यात सहभागी आहेत. एनडीआरएफची टीमही घटनास्थळी उपस्थित आहे. बचाव कार्यासाठी, एनडीआरएफ अतिरिक्त स्ट्रेचर तयार करत आहे ज्यामध्ये बेरिंग आणि चाकं बसवली जात आहेत जेणेकरून मजुरांना लांब पाईपमधून स्ट्रेचरद्वारे बाहेर काढता येईल. ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, स्ट्रेचरपासून ते बीपी उपकरणांपर्यंत सर्व वैद्यकीय मदत यंत्रे बोगद्याच्या ठिकाणी आहेत. एनडीआरएफ बचाव कर्मचारी गॅस मास्क आणि स्ट्रेचरसह आत जात आहेत. रुग्णवाहिका स्टँडबाय ठेवण्यात आल्या आहेत.