नवी दिल्ली - हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील मदिना गावात राहणाऱ्या एका वैज्ञानिकाने कमाल केली आहे. डॉ. शिवदर्शन मलिक असं या वैज्ञानिकाचं नाव असून ते गेल्या 6 वर्षांपासून शेणापासून सीमेंट, विटा व रंगाचं उत्पादन करत आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक लोकांना प्रशिक्षण दिले आहे. डॉ. शिवदर्शन मलिक यांनी रसायनशास्त्रात पीएचडी केली आहे. त्यांच्या गावात "गोबर गॅस प्लान्ट" स्थापन झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात शेण एकतर वाया जाते किंवा फक्त गवऱ्या तयार करण्यासाठीच वापरले जाते. गावात गवऱ्यापेक्षा गोबर गॅसचा उपयोग जास्त आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत शेणाच्या वापराचे प्रमाण कमी झाले आहे.
भारतात दररोज 33 ते 40 दशलक्ष टन शेण उत्पादन होते. डॉ. शिवदर्शन मलिक यांनी शेणाच्या संशोधन केले तेव्हा असे आढळले की, हा थर्मल इन्सुलेटेड पदार्थ आहे जो हिवाळ्यात घरे उबदार आणि उन्हाळ्यात थंड करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. भारतात शतकानुशतके कोटिंगसाठी माती आणि शेणाचे मिश्रण वापरले जाते. रोहतक येथील महाविद्यालयात काही महिने प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर डॉ. शिवदर्शन मलिक 2004 मध्ये आयआयटी दिल्ली आणि जागतिक बँकेने प्रायोजित केलेल्या नूतनीकरणयोग्य ऊर्जा प्रकल्पात सामील झाले. 2005 मध्ये त्यांनी यूएनडीपी प्रकल्पात काम केले. त्यादरम्यान, त्यांना अमेरिका आणि इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली जिथे त्यांनी पर्यावरणपूरक घरे बनविण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला.
भारतात परत आल्यावर त्यांनी शेणाविषयी सखोल अभ्यास सुरू केला आणि 2015-16 मध्ये त्यांनी वैदिक प्लास्टर नावाने शेण, जिप्सम, ग्वारगम, माती आणि लिंबू पावडर पासून सिमेंट तयार केले. त्यानंतर त्यांनी राजस्थानच्या बीकानेरमध्ये शेणापासून वीट बनवण्याचे एक युनिट स्थापित केले गेले ज्यामध्ये 15 लोक काम करतात. बीकानेरमध्येच शेणापासून बनवलेल्या विविध गोष्टींवर तीन दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाते. डॉ. शिवदर्शन मलिक शेणापासून तीन प्रकारच्या विटा तयार करतात. या विटा भट्टीत भाजल्या जात नाहीत किंवा त्यामध्ये पाणी वापरत नाही.
सिमेंट आणि विटा बनवल्यानंतर डॉ. मलिक यांनी 2019 मध्ये शेणापासून पेंट बनविण्यातही यश मिळवले. डॉ. मलिक यांनी आतापर्यंत उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड इत्यादी राज्यांमधील 100 हून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले आहे. हे प्रशिक्षित लोक आता देशाच्या कित्येक भागात शेणापासून विटा आणि सिमेंट बनवून आपले जीवन जगतात. डॉ. मलिक यांच्या दाव्यानुसार, एकदा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भेटण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी या तंत्राची प्रशंसा करून त्यांना खूप प्रोत्साहन दिले. डॉ. मलिक यांना हरियाणा कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.