नवी दिल्ली : पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राच्या वापरास बंदी घातल्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान वाहतूक करणाऱ्या भारतीय कंपन्यांना लांबचा पल्ला घेऊन विमाने उडवावी लागत आहेत. त्यातच तेल कंपन्यांनी हवाई इंधनाचे भाव वाढविल्याने कंपन्यांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे.
बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्ताननेभारतीय विमान वाहतूक कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. आणखी किमान १५ मेपर्यंत पाकिस्तानची ही बंदी कायम राहील, असे सूत्रांनी सांगितले. तेल कंपन्यांनी हवाई इंधनात २.५ टक्के वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मे महिन्यातील इंधनाचा दर ७०० डॉलर प्रतिकिलो झाला आहे. गेल्या महिन्यात तो ६६८ डॉलर प्रतिकिलो होता.
पाकिस्तानी हवाई बंदीमुळे दररोज ४०० विमानांना फटका बसत आहे. पाकिस्तानला टाळण्यासाठी भारतीय विमानांना ओमान हवाई क्षेत्रापर्यंत खाली जावे लागत आहे. इराणचे हवाई क्षेत्र जवळ असले तरी तेथे आधीच वाहतूक जास्त असल्यामुळे तेथे जास्तीची १०० उड्डाणेच सामावून घेता आली आहेत. पाकचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे विमान कंपन्यांचा सर्वच खर्च वाढला आहे. विमानांना जास्त अंतर कापावे लागत आहे. त्यासाठी जास्त इंधन, वेळ व मनुष्यबळ लागत आहे. एअर इंडियाने आपल्या पायलटांना ओव्हरटाईम करायला सांगितला आहे. एअर इंडियाच्या दिल्ली ते अमेरिका थेट विमानास इंधन भरण्यासाठी एक थांबा घ्यावा लागत आहे.
अरबी समुद्रावरून मस्कतचा फेराएअर इंडियची विमाने आता दिल्लीहून मुंबई आणि अहमदाबादमार्गे जातात. अरबी समुद्रावरून उड्डाण करून ते आधी मस्कतला पोहोचतात आणि तेथून आपल्या नियोजित स्थानी जातात.आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही भारतात येण्यासाठी पाकचे हवाई क्षेत्र टाळून यावे लागत आहे. सिंगापूर एअर लाइन्स, फिन्नएअर, ब्रिटिश एअरवेज, एअरोफ्लॉट, थाई एअरवेज यांचा त्यात समावेश आहे.