काश्मीरच्या अनंतनाग आणि राजौरीमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी आणि हल्ले यामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली. गेल्या ५ दिवसांच्या क्रॉस बॉर्डर कॉल इंटरसेप्शनवरून ही माहिती उघड झाली. पाकिस्तानच्या बाजूने दहशतवादी एकाच वेळी अनेक हल्ल्यांची योजना आखत होते, असं यात समोर आले आहे.
तीन बडे अधिकारी शहीद...! पाकिस्तानने पुन्हा तीच चूक केली; सीमेपलिकडे मोठ्या हालचाली
भारताच्या अध्यक्षतेखालील G20 च्या यशामुळे पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानने आखली होती, G20 पासून पाकिस्तानी लष्कर मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते, असा दावा सूत्रांनी केला आहे.
काश्मीरमध्ये दोन दिवसांत दोन मोठे हल्ले झाले आहेत. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये बुधवारी १३ सप्टेंबर रोजी सुरक्षा दल आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशिष धनौत आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट्ट शहीद झाले आहेत, तर चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले आहेत. तसेच राजौरी येथे एलईटीचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतीपोटी पाकिस्तानकडून सीमेपलीकडून हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांना पाठवले जात असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली.
तीन बडे अधिकारी शहीद
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये बुधवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सैन्याचे तीन मोठ्या रँकचे अधिकारी शहीद झाले. एक कर्नल, एक मेजर आणि एक डीएसपी होते. कोकेरनाग भागात जवानांवह हल्ला करणारे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यांना चारही बाजुंनी घेरले गेले होते. अचानक समोरून हल्ला झाला आणि यात राष्ट्रीय रायफल्सचे युनिट कमांडिंग ऑफिसर (कर्नल) मनप्रीत सिंग, कंपनी कमांडर (मेजर) आशिष धोनचक आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना प्राण गमवावा लागला.
पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण भारतात शोक आणि संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात येत असून पुतळे जाळण्यात येत आहेत. भारतीय लष्करही दहशतवाद्यांना घेरण्यासाठी पूर्ण पुराव्यानिशी खोऱ्यात दाखल झाले आहे. या हल्ल्याशी संबंधित लष्कराच्या दोन्ही दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे वृत्त आहे.