ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने भारताने त्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. जम्मू-काश्मीरला लागून असलेल्या सीमेवर गोळीबार झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल ए.के.भट्ट यांनी आपल्या पाकिस्तानी समकक्षांशी फोनवरून संवाद साधताना हा इशारा दिला आहे. तसेच नियंत्रण रेषेवर शांतरा राखण्यासाठी भारत कटीबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भट्ट यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सुनावताना सांगितले की, भारताला कोणत्याही प्रकारच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. आज सकाळी पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता. तर पुंछ विभागात पाकिस्तानी सैन्याने निवासी भागात केलेल्या गोळीबारात एका मुलीचा मृत्यू झाला होता.
दोन्ही देशांमध्ये झालेल्या डीजीएमओ स्तराच्या चर्चेमध्ये पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या गोळीबारात आपले चार सैनिक ठार झाल्याचा दावा केला. त्याचवेळी भारताने पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या कुठल्याही हल्ल्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल असे भारताने डीजीएमओ स्तरावरील चर्चेत पाकिस्तानला बजावले आहे. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानच्या विनंतीवरुन दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाल्यानंतर पाकिस्तानने अशा प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.