नवी दिल्ली: भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या एका पाकिस्तानी बोटीतून ७७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. या हेरॉइनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४०० कोटी रुपये आहे. अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी पाकिस्तानी बोटीतील सात जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधानांनी (PM Modi) यात विशेष लक्ष घालण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला असे वाटते की आर्यन खानला वगैरे पकडून तमाशा करणारे, नवाब मलिक यांच्या जावयाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणारे जे मुंबईमधील एनसीबीचे गाजलेले अधिकारी आहेत त्यांना गुजरातची जबाबदारी दिली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
गुजरातअमली पदार्थाची वाहतूक, सेवनाचे सर्वांत मोठे पोर्ट
गुजरात हे अमली पदार्थाच्या वाहतुकीचे, सेवनाचे सर्वात मोठे पोर्ट झालेले दिसत आहे. ही गंभीर गोष्ट आहे. संपूर्ण देशाला एखाद्या नशेत गुंग करण्यासाठी गुजरातच्या भूमीचा वापर होतोय का, यासाठी पंतप्रधानांनी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात एटीएसने गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका बांधकामाधीन घरातून सुमारे ६०० कोटी रुपयांचे हेरॉईन ड्रग्जची खेप जप्त केली होती. पाकिस्तानी ड्रग्ज विक्रेत्यांनी ही खेप अरबी समुद्रमार्गे त्यांच्या भारतीय समकक्षांना पाठवली होती, असे एटीएसने म्हटले होते. तत्पूर्वी, कच्छमधील मुंद्रा बंदरात भारतातील सर्वांत मोठ्या हेरॉईनचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केला होता. दोन कंटेनरमधून सुमारे ३ हजार किलो ड्रग्ज जप्त केले होते. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत २१ हजार कोटी रुपये होती.