द्रास (कारगिल) : पाकिस्तानने इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही आणि विषय धगधगता राहावा यासाठी दहशतवादाच्या नावाखाली छुपे युद्ध सुरूच ठेवले आहे. मात्र, दहशतवाद्यांचे हे नापाक इरादे कधीही पूर्ण होणार नाहीत, आमचे शूर जवान त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कारगिल युद्धातील विजयाच्या राैप्य महोत्सवी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. यावेळी ते बोलत होते.
अग्निपथ योजना म्हणजे लष्कराने हाती घेतलेल्या आवश्यक सुधारणांपैकी एक आहे. परंतु विरोधकांनी त्यातही राजकारण केल्याची टीका मोदी यांनी केली.
३० वर्षांनंतरच्या पेन्शनसाठी आज शिव्याशाप खाईन का?‘सरकारने पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी अग्निपथ योजना आणली, असा गैरसमज काही लोक पसरवत आहेत. अशा लोकांच्या विचाराची लाज वाटते; पण त्यांना विचारले पाहिजे. मोदींच्या राजवटीत आज ज्यांची भरती होईल त्यांना पेन्शन आताच द्यावी लागेल का? त्याला पेन्शन देण्याची वेळ ३० वर्षांनी येईल. मोदी तेव्हा १०५ वर्षांचे असतील आणि तेव्हा मोदींचे सरकार असेल का? ३० वर्षांनंतर द्याव्या लागणाऱ्या पेन्शनसाठी आज शिव्याशाप खाईल, असे राजकारणी मोदी आहेत का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
यांनीच सैन्यात हजारो कोटींचे घोटाळे केले‘हे तेच लोक आहेत, ज्यांनी सैन्यात हजारो कोटींचे घोटाळे करून आमचे सैन्य कमकुवत केले. त्यांचीच हवाई दलाला कधीही आधुनिक लढाऊ विमाने मिळू नयेत, अशी इच्छा होती. यांनीच तेजस लढाऊ विमान थंडबस्त्यात टाकण्याची तयारी केली होती’, असा आरोपही मोदींनी विरोधकांवर केला.
तरुणांत अग्निवीरबद्दल प्रचंड संताप : खरगेमोदी सरकारने लष्कराच्या सांगण्यावरून अग्निपथ योजना लागू केली, हे उघड खोटे आहे आणि बलाढ्य लष्कराचा अक्षम्य अपमान आहे. माजी लष्करप्रमुख (निवृत्त) जनरल एमएम नरवणे यांनी सांगितले आहे की ‘अग्निपथ योजनें’तर्गत ७५% लोकांना कायम ठेवायचे होते आणि २५% लोकांना ४ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त करायचे होते; पण मोदी सरकारने याच्या उलट केले आणि तिन्ही लष्करी दलांमध्ये ही योजना जबरदस्तीने लागू केली. देशातील तरुणांमध्ये अग्निवीरबद्दल प्रचंड संताप आणि तीव्र विरोध आहे. अग्निपथ योजना बंद करावी, ही काँग्रेसची मागणी कायम आहे.-मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
१.२५ लाख कोटी रुपयांहून अधिक निधी माजी सैनिकांना मोदी सरकारने दिला ५०० कोटींचा निधी देत काँग्रेस ‘वन रँक, वन पेन्शन’वर खोटे बोलली, असे मोदी म्हणाले.