नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत चाललेला आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत. पाकिस्तानी सैन्यातील सशस्त्र जवानांचा ताफा लडाख सीमेजवळ पोहचत आहे. तसेच याठिकाणी पाकची लढाऊ विमानंही तैनात करण्यात आली आहे. शस्त्र घेऊन जाण्यासाठी पाकिस्तानने सी 130 एअरक्राफ्ट्सचा वापर केला आहे.
सरकारी सूत्रांच्या हवाल्यानुसार लडाख हा केंद्रशासित प्रदेश जाहीर केल्यानंतर सीमेवर असणाऱ्या एअरबेसवर शनिवारी पाकिस्तानी वायूसेनेचं सी -130 एअरक्राफ्ट्स काही सामान घेऊन दाखल झालं आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानच्या हालचालींवर करडी नजर ठेऊन आहेत. तसेच पाकिस्तानची वायूसेना JF-17 हे लढाऊ विमानही याठिकाणी तैनात करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पाकिस्तानकडून सुरु असणाऱ्या हालचालींवर भारतीय गुप्तचर यंत्रणा बारीक लक्ष ठेऊन आहेत. पाकिस्तान सी 130 मालवाहक विमान अमेरिकेकडून काही वर्षांपूर्वी पाकला देण्यात आलं होतं. पाकिस्तानातील सैन्य कमांडर जिया उल हक याचा मृत्यू ऑगस्ट 1988 मध्ये सी 130 विमान उड्डाणावेळी झाला होता. त्यावेळी विमानात एक बॉम्ब फुटला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानची वायूसेना एक सैन्य अभ्यास करण्यासाठी याठिकाणी आली आहे. या हालचाली त्या प्रात्यक्षित अभ्यास वर्गाचाही भाग असू शकतात. मात्र अनेकदा पाकिस्तानची वायूसेना स्कर्दू एअरबेसचा वापर भारतीय सीमेवर कारवाया करण्यासाठी केला जातो.
दरम्यान कलम ३७० हटवल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह, दिल्ली, पंजाब यासारख्या मोठ्या शहरात येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. विशेषतः नवी दिल्लीतील लाल किल्ला मुख्यत्वेकरून दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी मिळाली आहे. याठिकाणी दहशतवादी आयईडी, सरकारी गाडी किंवा गणवेश याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह नवी दिल्ली आणि इतर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.