राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहिल्यांदाच पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याचा समावेश वॉन्टेड लिस्टमध्ये केला आहे. या अधिकाऱ्याचा फोटोदेखील एनआयएने जारी केला आहे. आमीर जुबेर सिद्दीकी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सिद्दीकीसोबतच दोन अन्य पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेशदेखील एनआयएने वॉन्टेड लिस्टमध्ये केला आहे. आमीर जुबेर सिद्दीकी कोलंबोतील पाकिस्तानातील उच्चायुक्तालयात व्हिसा समुपदेशक म्हणून काम करतो. अमेरिका आणि इस्रायलच्या दुतावासांवर २६/११ सारखा हल्ला करण्याची योजना आखल्याचा आरोप सिद्दीकीवर ठेवण्यात आला आहे. याशिवाय दक्षिण भारतातील लष्कराच्या आणि नौदलाच्या तळांवर हल्ल्याचा कट आखण्याचा आरोपदेखील पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. श्रीलंकेतील उच्चायुक्तालयात तैनात असलेला आणखी एक पाकिस्तानी अधिकारीदेखील यामध्ये सहभागी असल्याची माहिती एनआयएने दिली आहे. त्यामुळेच एनआयएने या अधिकाऱ्यांचा समावेश वॉन्टेड लिस्टमध्ये केला आहे. याशिवाय या अधिकाऱ्यांविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी करावी, अशी मागणीदेखील एनआयएकडून केली जाणार आहे. एनआयएच्या वॉन्टेड लिस्टमध्ये नावाचा समावेश झाल्याने आमीर जुबेर सिद्दीकीला पाकिस्तानने मायदेशी बोलावल्याचे वृत्त आहे. एनआयएने सिद्दीकीविरोधात फेब्रुवारीत आरोपपत्र तयार केले आहे. मात्र इतर तीन अधिकाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
पाकिस्तानला करायची होती २६/११ ची पुनरावृत्ती?; एनआयएनं कट उधळला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 12:09 PM