अहमदाबाद : सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील हरामी नाला खाडी भागातून पाकिस्तानच्या तीन मच्छीमारांना ताब्यात घेऊन पाच बोटी जप्त केल्या.भारत-पाक सीमेवर गस्तीसाठी नेमलेल्या बीएसएफच्या ७९व्या बटालियनच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. या मच्छीमारांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाशी द्वैवार्षिक चर्चेसाठी पाकिस्तानी लष्कराचे उच्च पातळीवरील शिष्टमंडळ भारतात आले असताना, हा प्रकार घडला.यापूर्वीही क्रीक भागाच्या भारतीय बाजूकडे मच्छीमारी करताना पाकिस्तानी मच्छीमारांना पकडून त्यांच्या अनेक बोटी जप्त करण्यात आल्या होत्या. ताजी कारवाईझाली, तो भाग अतिशय संवेदनशील असून, तिथे जाण्यास भारतीय मच्छीमारांनाही मासेमारीसाठी मज्जाव करण्यात आला आहे. तरीही पाकिस्तानी मच्छीमार भारतीय सागरी हद्दीतील या भागांत येऊन मासेमारी करतात.बीएसएफच्या गस्ती पथकाने गेल्या ६ सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या दोन मच्छीमारांना अटक करून, त्यांच्याकडील २५ फुटांच्या तीन पाकिस्तानी स्वयंचलित लाकडी बोटी जप्त केल्या होत्या. ही कारवाईदेखील हरामी नाला भागातच झाली होती.बीएसएफच्या तुकडीने १५०किलो मासे, मासेमारीच्या जाळ््या, भांडी व डिझेल जप्त केले होते.अटक केलेल्या मच्छीमारांची नावे अबिद अली (१९) आणि मन्सूर हस्सान दोघेही शाहबंदरचे (जिल्हा सुजावल, सिंध) रहिवासी होते.पाच जण या वेळी पळून गेले, असे अधिकाºयाने सांगितले.
पाकच्या तीन मच्छीमारांना भारतीय हद्दीत अटक, बीएसएफने गुजरातमध्ये बोटीही केल्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 4:56 AM