मुझफ्फराबाद : भारतातील काश्मीरवर आपला हक्क सांगणाऱ्या आणि काश्मीर भारतापासून तोडण्याचे मनसुबे रचणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पाकिस्तानामध्येच गो बॅक, नवाझ शरीफ गो बॅक अशा घोषणा एकण्याची वेळ आली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये नवाझ शरीफ यांच्याविरोधात उघडपणे घोषणा दिल्या जात असून, ठिकठिकाणी त्यांच्याविरोधी घोषणांचे पोस्टर्स, होर्डिंग्जही लावण्यात आली आहेत.पाकव्याप्त काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या असेंब्ली निवडणुकांत नवाझ शरीफ यांच्या पक्षाने दणदणीत विजय मिळवला. तरीही अवघ्या दिवसांत तेथील जनता नवाझ शरीफ यांच्याविरोधात रस्त्यांवर आली असून, काही ठिकाणी तर पाकिस्तानचे झेंडेही पेटवून देण्यात आले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील रस्त्यारस्त्यांवर नवाझ शरीफ यांच्याविरोधात घोषणा दिल्या जात असून, संपूर्ण मुझफ्फराबाद शहरात तशा घोषणा लिहिलेली पोस्टर्स आणि होर्डिंग्ज झळकत आहेत. असेंब्ली निवडणुकात आपल्याला बहुमत मिळाल्याचा दावा पंतप्रधान शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीगतर्फे केला जात असला तरी या पक्षातर्फे निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्यात आली आणि त्यामुळेच त्या पक्षाला बहुमत मिळाल्याचे दिसत आहे, असा पाकव्याप्त काश्मीरमधील मतदारांचा आरोप आहे. पाकिस्तान मुस्लीम लीगच्या कार्यकर्त्यांनी तिथे विरोधी मतदान करण्याची शक्यता असलेल्या मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचूच दिले नव्हते. त्यामुळे जनतेचा राग पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वा त्यांच्या पक्षापुरता न राहता पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आल्याने देशभर चिंता व्यक्त केली जात आहे. (वृत्तसंस्था)काश्मिरात पुन्हा कर्फ्युफुटीरवाद्यांचा येथील प्रस्तावित मोर्चा हाणून पाडण्यास दक्षिण काश्मिरच्या चार जिल्ह्यांसह श्रीनगर शहरात शुक्रवारी पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुलगाम, अनंतनाग, पुलवामा आणि शोपियांसह श्रीनगरमध्ये संचारबंदी तर उत्तर आणि मध्य काश्मिरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे, असे पोलीसांनी सांगितले. निदर्शक व सुरक्षा दलांतील संघर्षाच्या घटनांत दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह ४७ लोक ठार तर इतर ५,५०० जण जखमी झाले आहेत.
पाकव्याप्त काश्मिरात जाळले पाकचे झेंडे
By admin | Published: July 30, 2016 2:27 AM