नवी दिल्ली: डीआरडीओमध्ये कनिष्ठ अभियंता असलेल्या निशांत अग्रवालला सोमवारी अटक करण्यात आली. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप निशांतवर आहे. निशांतला पाकिस्तान हस्तकाकडून 30 हजार अमेरिकन डॉलर महिना पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं होतं. कॅनडात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळेल, असं प्रलोभन निशांतला दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यानं ब्रह्मोस क्षेपणास्त्राबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप आहे. निशांत अग्रवाल सेजल कपूर नावाच्या एका कॅनडास्थित महिलेशी चॅट करायचा. निशांत फेसबुक आणि लिंक्डइनवरुन तिच्या संपर्कात असायचा. सेजलनं निशांतला लिंक्डइनवर येऊन संपर्क साधण्यास सांगितलं होतं. आपल्या वरिष्ठांशी निशांतला बोलता यावं यासाठी सेजलनं निशांतला लिंक्डइनवर आमंत्रित केलं होतं. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. निशांत सेजल कपूरसोबतच नेहा शर्मा नावाच्या महिलेशीदेखील चॅट करायचा. निशांत फेसबुकवरुन नेहाच्या संपर्कात होता. नेहा शर्माचं अकाऊंट पाकिस्तानमधलं आहे. निशांत आणखी कितीजणांशी संपर्क साधायचा आणि त्यानं नेमकी किती माहिती इतरांना दिली आहे, याचा तपास आता एटीएसकडून सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकानं सोमवारी नागपूरमधून निशांतला अटक केली. त्याच्या कॉम्युटरमध्ये संरक्षण क्षेत्राबद्दलची अतिशय संवेदनशील माहिती असल्याचं एटीएसच्या तपासात आढळून आलं आहे. निशांतला काल नागपूरच्या सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरोधात गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
Brahmos Missile : ...म्हणून निशांत अग्रवालनं पाकिस्तानला दिली ब्रह्मोसची गोपनीय माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 4:03 PM