जम्मू-काश्मीर : भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले.
सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे भारतीय हवाई दलाच्या रडारने टिपले. यानंतर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानची विमाने वेगाने घिरट्या घालत होती की येथील साऊंड बॅरिअर सुद्धा तुटले आहे.
दरम्यान, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. बुधवारी पाकिस्ताने पुन्हा पुंछ परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला. यामुळे स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानच्या या नापाक हरकतीला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) ट्रेड सेंटरवरच पाकिस्तानने शेल्सचा मारा केल्याने एलओसीवरील भारत-पाकिस्तान दरम्यानचा व्यापार बंद करण्यात आला आहे. याआधी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील व्यापार बंद करण्यात आला होता.
गेल्या महिन्यात पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये घुसून भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई केली होती. तेव्हापासून जम्मू-काश्मीर सीमा भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ, राजौरीसह नियंत्रण रेषेजवळील सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे.