नवी दिल्ली : पाकिस्तानबरोबरच्या संयुक्त लष्करी कवायती करण्यासाठी रशियन सैन्याची तुकडी पाकिस्तानात दाखल झाली असली तरी या कवायती पाकव्याप्त काश्मीरमध्ये करणार नाही, असे रशियाने स्पष्ट केले आहे. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाने पाकसोबतच्या कवायती रद्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. रशियाने उरी हल्ल्याचा कडक शब्दांत निषेधही केला होता. पण आधी ठरलेल्या संयुक्त कवायती रद्द झाल्या नाहीत. मात्र त्या पेशावरमध्ये होणार असल्याचे रशियातर्फे सांगण्यात आले. या कवायती पाकिस्तान व्याप्त काश्मीर किंवा अन्य संवेदनशील ठिकाणी होणार नाहीत, असे भारतातील रशियन दूतावासाने स्पष्ट केले आहे. पेशावरपासून ३४ मैल अंतरावरील चेराट येथे कवायती होणार आहेत. पाक व रशियामध्ये प्रथमच संयुक्त लष्करी कवायती होत असून, या सरावाला फ्रेन्डशिप २०१६ असे नाव देण्यात आले आहे. रशियाच्या ‘तास’ या वृत्तसंस्थेने पाकव्याप्त काश्मीरमधील गिलिगट, बाल्टीस्तान या भागात संयुक्त लष्करी कवायती होणार असल्याचे वृत्त दिल्याने उलटसुलट चर्चांना उत आला होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्या झाल्या असत्या, तर भारतानेही त्याबद्दल रशियाकडे नाराजी व्यक्त केली असती. मात्र रशियन दूतावासाने भूमिका स्पष्ट केल्यानंतर ‘तास’नेही आॅनलाइन वृत्तामध्ये बदल केला आहे. गिलिगट, बाल्टीस्तान हा भाग पाकिस्तानने अनिधकृतरित्या बळकावला आहे, अशी भारताची सुरुवातीपासूनच भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांचा मुद्दा उपस्थित केला होता. तो भाग पाकिस्तानचा नाही, असेच भारताचे म्हणणे आहे. फ्रेन्डशिप २०१६ अंतर्गत रशियन आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये दोन आठवडे युद्ध सराव चालणार आहे. (वृत्तसंस्था) चर्चा रशियाशी मैत्रीमुळेच- रशिया हा भारताचा अत्यंत जवळचा मित्र आहे. त्यामुळे रशियाच्या पाकिस्तानसोबतच्या लष्करी कवायतींबाबत इतकी चर्चा सुरू आहे. शीतयुद्धाच्या काळात भारत रशियाच्या गोटातील देश, तर पाकिस्तान हा अमेरिकेच्या गोटातील देश अशी ओळख होती. आता मात्र अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिकेची अनेकदा कानउघाडणी केली आहे.
पाक-रशिया संयुक्त कवायती पेशावरमध्ये
By admin | Published: September 25, 2016 2:56 AM