जम्मू -काश्मीर : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री भारतात परतले. मात्र, सीमेवर भारत-पाकिस्तान दरम्यान अद्याप तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे.
जम्मू-काश्मीरमधील मेंढर, उरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी रेंजर्सने गोळीबार केला. या गोळीबारात पुंछ जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी रेंजर्सकडून सामान्य नागरिकांना लक्ष केले. त्यांच्याकडून ग्रेनेड अटॅक आणि मोर्टारने हल्ला केला जात आहे. पुंछ जिल्ह्यातील सलोत्रीमध्ये मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला. यात एकाच परिवारातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत.
दुसरीकडे, कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी शुक्रवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांचे पाच जवान शहीद झाले. शहीद झालेल्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचा (सीआरपीएफ) एक निरीक्षक आणि जवान, त्याचबरोबर लष्कराचे दोन जवान आणि एक पोलीस यांचा समावेश आहे. चकमकीत चार जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी (27 फेब्रुवारीला) सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले असता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र, ते पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यावेळी त्यांना पाकिस्तानच्या लष्कराने ताब्यात घेतले. अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केले आहे.