नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरवरून आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी खडेबोल सुनावले आहेत. पाकव्याप्त काश्मीर हा सुद्धा भारताचाच अविभाज्य भाग असून, त्यावर भाराताच हक्क आहे. हा भाग पाकिस्तानच्या कब्जातून सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहू, असे अहिर यांनी म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग बनला आहे. भारत तो आता परत मिळवू शकत नाही, असे वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. त्याला अहीर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "फारुख अब्दुल्ला यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. मात्र आधीच्या सरकारांमुळे तो पाकिस्तानकडे गेला आहे. आता हा भाग परत मिळवण्याचा प्रयत्न आम्ही केल्यास आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,"असे अहिर यांनी म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही, असे फारुख अब्दुल्ला यांनी काल म्हटले होते. काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या उरी येथे एका कार्यक्रमात अब्दुल्ला म्हणाले होते की, "कधीपर्यंत निरपराध लोकांच्या रक्ताचे पाट वाहत राहणार आणि कधीपर्यंत आम्ही पाकव्याप्त काश्मीर आमचे आहे म्हणून सांगत राहणार. काश्मीर यांच्या बापाचे नाही आहे." "काश्मीरची विभागणी होऊन 70 वर्षे झाली. नियंत्रण रेषेपलिकडे पाकिस्तान आहे आणि हे हिंदुस्तान आहे. 70 वर्षांत तो भाग हे परत मिळवू शकलेले नाहीत. तरीही आता पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग आहे म्हणून सांगताहेत,"असेही अब्दुल्ला पुढे म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरवरून फारुख अब्दुल्ला यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केले होते."पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे. जम्मू-काश्मीर ज्याप्रमाणे भारताचा भाग आहे तसेच पीओकेवर पाकिस्तानचा अधिकार आहे, असे फारुख अब्दुल्ला म्हणाले होते. काश्मीरचा मुद्दा सोडवायचा असल्यास आपल्याला पाकिस्तान बरोबर चर्चा करावी लागेल. केंद्र सरकारला काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर त्यांना पाकिस्तान बरोबर चर्चा करावीच लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला होता. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने दिनेश्वर शर्मा यांची निवड केली आहे. त्यांच्याबद्दल तुमचे मत काय ? असा प्रश्न फारुख अब्दुल्ला यांना काही दिवसांपूर्वी विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले, मी यावर जास्त बोलू शकत नाही. त्यांनी काही जणांबरोबर चर्चा केली आहे पण फक्त चर्चेने तोडगा निघणार नाही. काश्मीरचा मुद्दा हा भारत-पाकिस्तानमध्ये आहे. भारत सरकारने पाकिस्तानबरोबर चर्चा केली पाहिजे कारण काश्मीरचा काही भाग त्यांच्या ताब्यात आहे.