नवी दिल्ली - नवज्योत सिंग सिद्धू यांचा पाकिस्तान दौरा आणि दौऱ्यादरम्यान पाकिस्तानी लष्कर प्रमुख बाजवा यांच्यासोबत झालेल्या गळाभेटीचा वाद संपुष्टात येण्याचे नावच घेत नाहीय. ''नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे एजंट असून इमरान खान त्यांचा बोलक्या बाहुल्याप्रमाणे वापर करत आहेत'',अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धू यांनी उपस्थिती दर्शवल्याबाबत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
सिद्धू यांच्या रुपात पाकिस्तानला नवीन एजंट मिळाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान त्यांचा बोलक्या बाहुल्याप्रमाणे वापर करुन घेत आहेत आणि सिद्धू त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत, अशी बोचरी टीका हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे. पाकिस्तानला जाऊन त्यांनी जनतेच्या भावना दुखावल्या. आता राहुल गांधी सिद्धूवर कारवाई करणार का?, असा प्रश्नही हरसिमरत कौर यांनी विचारला आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी करतारपूर मार्ग खुला करण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पहिले पाऊल उचलावे आणि पाकिस्तानशी चर्चा करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका केली. 'नवज्योतसिंग सिद्धू यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. पाकिस्तानने करतारपूर कॉरिडोरला हिरवा कंदील देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत भारत सरकारकडे पाकिस्तानने पत्रव्यवहारदेखील केलेला नाही, असा कौर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.