श्रीनगर -Farooq abdullah on Pakistan ( Marathi News ) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद सोडवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे संवाद, कारण कुठल्याही हिंसक कृत्याचे पडसाद जम्मू काश्मीरच्या लोकांवर होतील. पाकिस्ताननेही बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहेत असं विधान नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अब्दुल्ला यांनी हे म्हटलं आहे.
राजनाथ सिंह यांनी पीओके भारताच्या ताब्यात घेऊ असं वक्तव्य केले होते. त्यावर फारूख अब्दुल्ला म्हणाले की, संरक्षण मंत्र्यांना असं करण्यापासून कुणी रोखणारं नाही. त्यांनी तसं करू द्या, त्यांना रोखणार कोण? तसेही ते आम्हाला विचारत नाहीत. परंतु लक्षात ठेवा, पाकिस्ताननेही बांगड्या भरल्या नाहीत. त्यांच्याकडे अणुबॉम्बही आहेत. दुर्दैव हेच असेल की ते अणुबॉम्ब आमच्यावर डागतील असं त्यांनी सांगितले.
तसेच युद्धाशिवाय एक पर्याय आहे तो म्हणजे चर्चा, संवाद...केंद्र सरकार चीनसोबत १९ वेळा चर्चा करू शकते. चीननं आपल्या हजारो एकर जमिनीवर कब्जा केला आहे. चीन भारतासमोर झुकत नाही. तो सातत्याने पुढे सरकत आहे. मग केंद्र सरकार पाकिस्तानशी संवाद का करू शकत नाही जेणेकरून येथील रक्तपात थांबेल आणि आम्ही शांतीने राहू शकू असा सवालही फारूख अब्दुल्ला यांनी केला आहे.
दरम्यान, आपले सैनिक दरदिवशी शहीद होतात पण केंद्र गप्प राहते. अनंतनागच्या राजौरी लोकसभा मतदारसंघात शनिवारी जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय वायू सेनेच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात १ जवान शहीद झाला तर ४ जखमी आहेत. दहशतवाद आहे की नाही यावर अमित शाह यांनी उत्तर दिले पाहिजे. दहशतवादासाठी कलम ३७० जबाबदार धरलं जात होते, आता ते कलम हटवलं तरीही दहशतवाद आहे की नाही हे गृहमंत्र्यांनी सांगावे असा टोलाही फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला लगावला.