नवी दिल्लीः राफेल लढाऊ विमानांच्या शस्त्रपूजेदरम्यान राजनाथ सिंहांनी त्यांच्या चाकांखाली लिंबू ठेवल्यानं ते वादात सापडले होते. अंनिसनंही या प्रकारावरून राजनाथ सिंहांवर टीकास्त्र सोडलं होतं, परंतु आता त्यांच्या बचावासाठी पाकिस्तानी सेना पुढे सरसावली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून नेहमीच भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तान चक्क राजनाथ सिंहांच्या बाजूनं उभं राहिलं आहे. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी गुरुवारी राफेलच्या शस्त्रपूजेवरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा बचाव केला आहे.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते राफेल विमानाची पूजा करण्यात आली होती. लढाऊ विमानाची पूजा करताना त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवण्यात आल्याने विरोधकांसह सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यावर पाकिस्तानचे सैन्य प्रवक्ते आसिफ गफूर म्हणाले की, राजनाथ सिंह यांनी राफेलची केलेली शस्त्रपूजा ही धर्मसंगत आहे. त्यात काहीच चुकीचं नाही. राफेलच्या विमानांची पूजेत कोणतीही चूक झालेली नाही. कारण ती धर्मशास्त्रानुसार करण्यात आली होती. खरं तर फक्त या विमानांचं महत्त्वाचं नसतं, तर ती हाताळणाऱ्या व्यक्ती, त्यांचा उत्साह आणि संकल्पाला महत्त्व असते. विशेष म्हणजे पाकिस्तान सेनेकडून हे विधान अशा वेळी आले, जेव्हा दोन्ही दक्षिण आशियाई देशांत तणाव विकोपाला गेलेला आहे. भारतानं जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे पाकिस्तानचा तीळपापड झालेला आहे.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिले राफेल विमान ताब्यात घेताना या लढाऊ विमानाची पूजा केली होती. विजयादशमी दिवशी संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या राफेल पूजनामुळे वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर या पूजेवरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. तर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही या पूजेवर टीका केली होती. या राफेल पूजनामुळे निर्माण झालेल्या वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, ''मला जे योग्य वाटले तेच मी केले. या विश्वात एक महाशक्ती आहे अशी आमची श्रद्धा आहे. तसेच माझासुद्धा लहानपणासून या गोष्टीवर विश्वास आहे, असे राजनाथ सिंह यांनी भारतात परतल्यावर म्हटले आहे. यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, ''मला वाटते की, या प्रकरणात काँग्रेसमध्ये सुद्धा मतभिन्नता असावी. कुठल्याही विषयावर सर्वांचं एकमत असेलच, असे नाही.'' दरम्यान, राफेल विमान भारताच्या ताब्यात आल्याने भारतीय हवाई दलाच्या संरक्षण आणि आक्रमकतेच्या शक्तीत वाढ होईल, असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
राफेल प्रकरणात राजनाथ सिंहांच्या बचावासाठी पाकिस्तानी सेना आली पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 3:42 PM