नवी दिल्ली : पाकिस्तान दहशतवाद्यांद्वारे जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा भडविण्यासाठी नवा डाव आखण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात भारतीय गुप्तहेर यंत्रणांनी काही कोड वर्ड्सचा खुलासा केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार घडविण्यासाठी या कोड वर्ड्सच्या माध्यमातून पाकिस्तानी सैन्य आणि तेथील विविध दहशतवादी संघटनाकडून जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कोड वर्ड्स पाकव्याप्त काश्मीरमध्ये एलओसी (LoC) जवळ लावण्यात आलेल्या एफएम ट्रान्समिशनच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहेत. ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मद (66/88), लष्कर-ए-तैयबा (ए3) आणि अल बद्र या दहशतवादी संघटनेसाठी (डी9) असे कोड ठेवण्यात आले आहेत. हा संपर्क पाकिस्तानचे राष्ट्रगीत ‘कौमी तराना’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. ज्यावेळी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर परिसरातील लँडलाइन, मोबाइल फोन आणि इंटवर्क बंद केले. त्यानंतर एक आठवड्यानंतर पाकिस्तानकडून अशाप्रकारे दहशतवाद्यांशी संपर्क साधण्यासाठी वापर करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, एलओसीजवळ पाकिस्तानने दहशतवादी तळ सुरू केल्याची खळबळजनक माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. एलओसीजवळ पाकिस्ताने सात दहशतवादी लाँच पॅड सुरू केले आहेत. तसेच, 275 जिहादी सक्रिय आहेत. याशिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अफगाण आणि पश्तून सैनिकांना देखील एलओसीजवळ तैनात करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून याआधीही सीमेपार दहशतवादी कारवायांसाठी अफगाण आणि पश्तून जिहादींचा वापर करण्यात आला आहे.
याआधी 1990 मध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये हिंसा भडवण्यासाठी आणि दहशतवाद वाढविण्यासाठी परदेशी जिहादींचा वापर केला होता. भारताविरोधात काश्मीर खोऱ्यात प्रॉक्सी युद्ध छेडण्यासाठीच पाकिस्तानने हा प्रयत्न केला होता. भारताने याला प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानने आपल्या रणनीतीत बदल केला. आता पाकिस्तान पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना काश्मीरमध्ये हिंसा भडकविण्यासाठी वापर करत आहे.