नवी दिल्ली : भारतातील घुसखोरी थांबवा, अन्यथा भारताकडे कारवाईचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, अशा शब्दांत लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे.
आज 27 ऑक्टोबर इन्फट्री दिनानिमित्त बिपिन रावत यांनी दिल्लीतील इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.
पाकिस्तानला माहित आहे की, त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. त्यांच्याकडून काश्मीरच्या विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काश्मीर कोणत्याही परिस्थितीत दोन हात करण्यासाठी तयार आहे. याशिवाय अन्य कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास आम्ही सक्षम आहोत, असे बिपिन रावत यांनी सांगितले.
दगडफेक करणाऱ्यांच्या हल्ल्यात ज्या 22 वर्षीय जवानाने आपल्या जीव गमावला तो लष्करासाठी रस्ते बांधण्याचे काम करणाऱ्या बॉर्डर रोड टीमच्या सुरक्षेसाठी तैनात होता. मात्र, आपल्या जवानाचा जीव गेल्यानंतरही आपल्याकडे काही लोक बोलतात की दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांचे समर्थक समजून नका, हे दुर्देवी असल्याचेही बिपिन रावत यांनी म्हटले आहे.