ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - दहशतवादाच्या माध्यमातून प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य भंग करणा-या पाकिस्तान विरोधात आता सर्व देशांनी एकत्र यायची वेळ आली आहे असे अफगाणिस्तानने म्हटले आहे. सर्व देशांनी एकत्र येऊन इस्लामाबादमध्ये होणा-या सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्यावर विचार केला पाहिजे असे अफगाणिस्तानचे राजदूत शायदा मोहम्मद अब्दाली यांनी सांगितले.
दक्षिण आशियाई देशांच्या एकत्र येण्यामुळे पाकिस्तानला कठोर संदेश मिळेल असे त्यांनी सांगितले. दहशतवादाला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचाही त्यांनी आरोप केला. भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेश नोव्हेंबरमध्ये होणा-या सार्क परिषदेवर बहिष्कार घालणार का ? या प्रश्नावर अब्दाली यांनी बहिष्काराचा निर्णय घेण्यासाठी जास्तीत जास्त देशांना एकत्र आणले पाहिजे. दक्षिण आशियात भारत आणि अफगाणिस्तानच्या विचारांशी बहुतांश देश सहमत आहेत असे उत्तर दिले.
शांतता आणि स्थैर्य भंग करणा-या पाकिस्तानला आता एकाकी पाडण्याची वेळ आली आहे असे त्यांनी सांगितले. अफगाणिस्तानचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घानी यांची भारतापेक्षा पाकिस्तानच्या नेतृत्वाशी अधिक जवळीक होती. मात्र आता त्यांच्याच सरकारकडून सार्कवर बहिष्कार घालण्याची झालेली मागणी म्हणजे पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. अश्रफ घानी यांनीही फोनवरुन नरेंद्र मोदींशी चर्चा करुन उरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.