चोहोबाजुंनी आर्थिक संकटाने वेढलेला पाकिस्तान भारताने काही न करताच गुडघ्यावर आला आहे. काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर ज्या अविर्भावात पाकिस्तानने भारताशी उरले सुरलेले संबंध तोडले होते, त्याच वेगाने पाकिस्तानचे लष्करी अधिकारी दिल्लीत आले आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या प्रतिनिधीमंडळाने पहिल्यांदाच नवी दिल्लीत येत आयोजित केलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीला हजेरी लावली आहे.
हे सर्वजण एससीआयच्या कार्यगटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या भेटीला दुजोरा दिला आहे. या बैठकीला पाकिस्तानी अधिकारी आणि नेते देखील व्हर्च्युअल द्वारे हजर होते. आता या पुढचे पाऊल म्हणजे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री देखील भारतात येण्याची शक्यता पाकिस्तानी मीडियाने व्यक्त केली आहे.
सध्या भारताकडे एससीओचे अध्यक्षपद आहे. वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या बैठकीसाठी भारताने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनाही बोलावले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांच्या भारत भेटीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पाकिस्तानी लष्कराचे शिष्टमंडळ भारतातील SCO बैठकीत सहभागी झाले आहे.
या बैठकीत काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्याबद्दल भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे निमंत्रण रद्द केले होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि ऊर्जा मंत्री व्हिडिओ लिंकद्वारे SCO बैठकीत सहभागी झाले होते.