अहमदाबाद : पाकिस्तानी तटरक्षक दलाने आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताच्या तीस मच्छीमारांना ताब्यात घेतल्याचा आरोप पोरबंदर बोट असोसिएशनने केला आहे. याचबरोबर सहा ट्रॉलर्सही ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे.
सुमुद्रामध्ये सीमा लक्षात येत नसल्याने बऱ्याचदा भारत आणि पाकिस्तानचे मच्छीमार सीमापार करत असतात. या मच्छीमारांना तटरक्षक दल बोटींसह ताब्यात घेते. गुजरातच्या मच्छीमारांच्या तब्बल 1000 नौका पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते. या नौका सोडविण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. यापैकी अर्ध्याहून अधिक नौका आज खराब अवस्थेमध्ये आहेत. जी पुन्हा माघारी आणू शकत नाहीत.
नॅशनल फिशरवर्क फोरमचे सचिव मनीष लोधारी यांनी सांगितले की, साधारण आठ वाजता सर्व मच्छीमार मासेमारी करतात. यावेळी पाकिस्तानी तटरक्षक दलाने त्यांना कोणतीही सूचना न देता ताब्यात घेतले. नौका जप्त झाल्यावर मच्छीमारांना 20-30 लाखांचे नुकसान होते.
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर तणावाची स्थीतीमध्ये पाकिस्तानने गेल्या महिन्यात 100 मच्छीमार सोडले आहेत. हे मच्छीमार आंतराष्ट्रीय सीमा पार करून गेले होते. पाकिस्तानने चार टप्प्यांत 360 मच्छीमार कैद्यांना सोडण्याची घोषणा केली आहे.