नवी दिल्ली : पाकिस्तानमधील निवडणुका जवळ येत आहेत. यातच, पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येत आहे. यावर्षी पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तब्बल 480 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्यावर्षी पाकिस्तानने 111 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले होते. त्यातुलनेत यंदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनात 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शस्त्रसंधी उल्लंघनादरम्यान पाकिस्तानने फक्त भारतीय चौक्या आणि गावांवरच हल्ले केले नाहीत, तर भारतीय जवानांवर सुद्धा गोळीबार केला आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने यंदा दर दिवशी किमान तीन वेळा शस्त्रसंधी उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या या नापाक हरकतींनी भारतीय जवांनांकडून चोख प्रत्युत्तरही दिले जात आहे. 2003 मधील सीजफायर पॅक्ट पूर्णपणे लागू करण्यासंबंधी 29 मे रोजी पाकिस्तान आणि भारताच्या DGMOs ची बैठकीत दोन्हीं देशांकडून सहमती झाली होती. तरी सुद्धा पाकिस्तानकडून भारताला उकसवण्याचा प्रकार घडत आहे. अधिका-यांनी सांगितले की, इस्लामाबादमध्ये सध्या सरकारची अनुपस्थिती पाकिस्तान सैन्याच्या या कारवाईचे मोठे कारण आहे. आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन वाढले आहे, कारण पाकिस्तान रेंजर्स आणि तेथील सैन्य कोणत्याही नेतृत्वाला उत्तर देण्यास बांधील नाही आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक कमांडर्सनी हे प्रकरण आपल्या हातात घेतले आहे, एका अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान, 25 जुलैला पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणुकीपर्यंत शस्त्रसंधी उल्लंघन सुरु राहिल असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI देखील सक्रिय सहभाग घेत असून बीएसएफच्या जवानांना टार्गेट करण्यासाठी दहशतवाद्यांची मदत घेत आहे. दहशतवाद्यांना पाकिस्तानी रेंजर्सची मदत मिळत आहे.
पाकमध्ये निवडणुका तोंडावर, शस्त्रसंधी उल्लंघनात 400 टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 10:11 AM
पाकिस्तानमधील निवडणुका जवळ येत आहेत. यातच, पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येत आहे. यावर्षी पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तब्बल 480 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तब्बल 480 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन यंदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनात 400 टक्क्यांनी वाढ पाकिस्तानमधील निवडणुका जवळ येत आहेत