नवी दिल्ली: दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची तीव्रता सतत वाढत आहे. दृश्यमानता कमी झाल्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. याशिवाय दिल्लीकरांचा श्वासदेखील कोंडला जात आहे. पंजाब, हरयाणातले शेतकरी तण जाळत असल्यानं दिल्लीतली हवा प्रदूषित होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं या दोन्ही राज्यांमधील सरकारची चांगलीच कानउघाडणी केली. मात्र भाजपा नेत्यानं हवेच्या प्रदूषणासाठी पाकिस्तान आणि चीनला जबाबदार धरलं आहे. आपल्या देशाला घाबरणाऱ्या शेजारी देशानं विषारी वायू सोडला असावा. त्यामुळे हवा प्रदूषित झाली असावी. पाकिस्तान आणि चीन आपल्याला घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी विषारी वायू सोडला असावा, असं भाजपा नेते विनीत अग्रवाल यांनी म्हटलं. भाजपाच्या व्यापार विभागाचे संयोजक असलेल्या अग्रवाल यांनी आधीही अनेकदा अशी विधानं केली आहेत. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तानच दिल्लीतल्या प्रदूषणासाठी जबाबदार असल्याचं अग्रवाल म्हणाले.
दिल्लीतल्या प्रदूषणाला चीन, पाकिस्तान जबाबदार; भाजपा नेत्याचा 'हवाई'शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 9:45 AM