नवी दिल्ली: पाकिस्तान आणि चीन यांचं एकत्र येणं भारतासाठी धोकादायक आहे. पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम सुरू आहे. त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी उत्तर दिलं जाईल. त्यासाठीची वेळ आणि ठिकाण आम्ही निश्चित करू, असा स्पष्ट इशारा लष्करप्रमुख मनोज नरवणेंनी दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी देशापुढील धोक्यांची माहिती दिली.पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिलं जातं. मात्र आम्ही दहशतवाद कदापि सहन करणार नाही. ही आमची भूमिका आहे. दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यात येईल. त्यासाठीची वेळ आणि ठिकाण आम्ही निश्चित करतो, हा संदेश आपल्याकडून सीमेपलीकडील देशाला देण्यात आलेला आहे, असं नरवणे म्हणाले. यावेळी त्यांनी चीन आणि पाकिस्तानच्या जवळिकीवरही भाष्य केलं. 'लष्करी आणि बिगरलष्करी क्षेत्रांमध्ये चीन आणि पाकिस्तानचं सहकार्य वाढत आहे. त्यामुळे दोन आघाड्यांवर आव्हांनाचा सामना करण्याची तयारी आपल्याला ठेवायला हवी,' असं नरवणे म्हणाले.चिनी सैन्यासोबत लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव अद्याप संपलेला नसल्याची माहिती त्यांनी दिली. 'आम्ही याआधीही आव्हानांचा सामना करून मार्गक्रमण केलं आहे. भारतीय लष्करानं लडाखमध्येच नव्हे, तर संपूर्ण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गस्ती वाढवल्या आहेत. भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावरील आठ बैठका झाल्या आहेत. आता लवकरच नववी बैठक होईल,' असं नवरणेंनी सांगितलं.कोरोना महामारी आणि उत्तर सीमांवरील परिस्थिती आमच्यापुढील दोन प्रमुख मोठी आव्हानं होती. सीमेवरील परिस्थिती पाहता आम्ही सीमेवरील सतर्कता वाढवली आहे. सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे. पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे तयार आहोत, अशा शब्दांत नरवणेंनी चीनला इशारा दिला. भविष्यातील आव्हानांचा विचार लष्कराला अधिकाधिक सुसज्ज करण्यात येईल. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येईल, असं नरवणे म्हणाले.