इस्लामाबाद: भारतीय पाणबुडी पाकिस्तानच्या हद्दीत शिरल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. आयएनएस कलावरी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत शिरली होती, असा दावा पाकिस्ताननं केला आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ रशियानं एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी हा दावा केला आहे. १ मार्चला भारतीय पाणबुडी पाकिस्तानच्या हद्दीत शिरली होती, असं इफ्तिखार यांनी म्हटलं आहे. 'पाकिस्तानी नौदलाच्या पाणीबुडीविरोधी यंत्रणेनं १ मार्चला कलावरी पाणबुडीची हालचाल टिपली,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा भारतीय पाणबुडी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत शिरली आहे. मात्र सक्षम पाकिस्तानी नौदलाला वेळीच भारतीय पाणबुडीचा सुगावा लागला, अशा शब्दांत त्यांनी स्वत:च्या नौदलाचं कौतुक केलं आहे. यावर प्रतिक्रिया देण्यास भारतीय सैन्यानं नकार दिला आहे.
आयएनएस कलावरी पूर्णपणे स्वदेशी आहे. स्कॉर्पियन प्रकारात मोडणाऱ्या या पाणबुडीची निर्मिती मुंबईतल्या माझगाव डॉकमध्ये करण्यात आली आहे. आयएएन कलावरी अतिशय अत्याधुनिक स्वरुपाची आहे. लांब पल्ल्यापर्यंत मार करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. या पाणबुडीतून जहाजविरोधी क्षेपणास्त्रंदेखील डागता येतात.