अमृतसर - अमृतसरमधील राजासांसी येथील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यासाठी बुरखाधारी हल्लेखोरांनी वापरलेल्या ग्रेनेडसारख्या ग्रेनेडचा वापर पाकिस्तानी सैन्याकरून करण्यात येत असल्याचे या हल्ल्याचा तपास करत असलेल्या सुरक्षा यंत्रणांच्या तपासात उघड झाले आहे. अमृतसरमधील राजासांसी येथील निरंकारी भवनात सुरू असलेल्या सत्संगामध्ये करण्यात आलेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले होते. या हल्ल्यासाठी हल्लेखोरांकडून वापरण्यात आलेले ग्रेनेड हे एचई-36 या प्रकारचे असून, अशा प्रकारचे ग्रेनेड पाकिस्तानी सैन्याकडून वापरले जाते. हे ग्रेनेड फेकल्यानंतर सुरुवातीला धूर पसरतो. नंतर स्फोट होतो. दरम्यान, या हल्ल्यामागे कुठल्यातरी नव्या दहशतवादी संघटनेचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्यासाठी वापरलेले ग्रेनेड पाकिस्तानी लष्कराकडून वापरण्यात आलेल्या ग्रेनेडशी साधर्म्य दाखवणारे असल्याने या स्फोटामध्ये पाकिस्तानचा हात असण्याचाही संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंग यांनी अमृतसरमधील निरंकारी भवनावरील हल्लेखोरांबाबत माहिती देणाऱ्यांना 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
अमृतसरमधील ग्रेनेड हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन? गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागले महत्त्वपूर्ण धागेदोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 3:53 PM